बीड विधानसभा मतदारसंघात टपाली मतदान

🔷 बीड लोकसभा निवडणूक 2024/ टपाली मतदान

बीड, दि. 10 (जिमाका):- बीड विधानसभा मतदारसंघात तहसील कार्यालयात तसेच अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय परिसरात सुविधा केंद्र उभारण्यात आले असून या ठिकाणी पोलीस कर्मचारी अथवा निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील परिसरात बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुविधा केंद्राद्वारे पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी तथा टपाली नोडल अधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे यावेळी उपस्थित होते.

बीड लोकसभा मतदारसंघात एकूण झालेले टपाली मतदानाची स्ट्रॉंग रूम या ठिकाणी आहे. सोमवार दिनांक 13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडल्यानंतर झालेले टपाली मतदान शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहे. दिनांक 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी सर्वप्रथम टपाली मतदान मोजण्यात येईल. त्यानंतर विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी करण्यात येईल.