🔸मध्यरात्री 10 ते 15 जणांकडुन घरासमोर शिवीगाळ,संरक्षण देण्याची मागणी.
बीड/परळी वैजनाथ– राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जेष्ठ नेते फुलचंद कराड यांना शुक्रवार दि.10 मे रोजी मोबाईलवरुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.यानंतर रात्री कराड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मध्यरात्री 1.30 वाजता त्यांच्या नाथ नगर येथील निवास्थानासमोर 10 ते 15 जण येत घराचे दार वाजवून शिवीगाळ करत गदारोळ केला.कराड यांनी आवाज देताच गल्लीतील लोक जागे झाल्याने हल्याच्या उद्देशाने आलेले ते लोक पळून गेले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जेष्ठ नेते फुलचंद कराड हे या लोकसभा निवडणुकीत सक्रिय होत त्यांनी बारामती येथे जावुन सुप्रियाताई सुळे यांचा प्रचारही केला होता.तसेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व इतर सभेत त्यांनी केलेल्या भाषणामुळे विरोधकांची बोलती बंद झाली होती.यातच शुक्रवार दि.10 मे रोजी रात्री 9.30 वाजता फुलचंद कराड हे आपल्या कार्यालयात कार्यकारीणीची बैठक घेत असताना त्यांना 9404241212 या नंबरवरून फोन आला व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच कराड यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यानंतरही या फोनवरुन त्यांना सारखे फोन येत होते व धमक्या दिल्या जात होत्या.रात्री 1.30 वाजेच्या सुमारास कराड हे आपल्या निवासस्थानी असताना 10 ते 15 जण तोंडाला बांधून आले व घराचे दार वाजवून बाहेर ये असे म्हणत होते.हा आवाज ऐकून कराड हे घराच्या टेरेसवर जावुन आवाज दिल्यानंतर गल्लीतील लोक जागे झाल्याने ते हल्लेखोर पळून गेले.दरम्यान काही दिवसापुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या सुदामती गुट्टे यांनाही अशाच प्रकारची शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.यानंतर फुलचंद कराड यांना जीवे मारण्याची धमकी देणाराचा तपास करुन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी फुलचंद कराड यांनी केली आहे.