जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रावर इन कॅमेरा फेर मतदान घ्या.. बजरंग सोनवणे

बीड लोकसभा निवडणूक/ बूथ ताब्यात घेणे -बोगस मतदान 

बीड – १३  मे रोजी जिल्ह्यात लोकसभा २०२४  साठी मतदान प्रक्रिया पार पडली मात्र यात जिल्ह्यातील परळी सह इतर काही ठिकाणी बुथ ताब्यात घेत बोगस मतदान करणे, मतदारांना धमकावणे आधी प्रकार झाल्याचे नमूद करत या ठिकाणी इन कॅमेरा फेर मतदान घेण्याची मागणी बजरंग सोनवणे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देऊन केली आहे.

जिल्ह्यात लोकसभा २०२४ साठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळेस काट्याची लढत भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात दिसून आली. दरम्यान परळी मतदार संघातील वालेवाडी, जिरेवाडी, साबळा,नाथरा, धर्मापुरी, डिग्रस, केळगाव, ईजेगाव, सारडगाव, कनेरवाडी, या गावातील मतदान केंद्र आणि मतदान केंद्र क्रमांक १३२, १६१, १८८, १८९ , त्याच बरोबर केज तालुक्यातील देवगाव, लाडेवडगाव, माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी, धारूर मधील सोनीमोहा, पिंपरवाडा, मैदवाडी, चाडगाव, आष्टी विधानसभा मतदारसंघातील वाली आणि पाटोदा मधील वाघिरा हे सर्व मतदान केंद्र ताब्यात घेऊन येथे बोगस मतदान केल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे. या प्रकारा बाबत आपण वारंवार जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वारंवार फोन करून बोगस मतदान होत असल्याचे सूचित करत विनंती केली मात्र त्यांनी या बद्दल कुठलीही कारवाई केली नाही.

दरम्यान जिरेवाडी येथें मागासवर्गीय आणि धर्मापुरी येथे काही मुस्लिम समाजातील मतदारांना मतदान करू दिले नाही. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघ माजलगाव, धारूर आदि ठिकाणचे मतदान केंद्रे या ठिकाणी इन कॅमेरा फेर मतदान घेण्याची मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

🔷 जिल्ह्यातील निवडणुकीत मतदानापूर्वीच जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना ७ मे रोजी आणि स्मरण पत्र म्हणून ९ मे रोजी परळी आणि इतर मतदारसंघातील काही मतदान केंद्रातील मतदान हे इन कॅमेरा घ्यावे म्हणून विनंती केली होती. मात्र परळी विधानसभा मतदारसंघात इन कॅमेरा मतदान घेण्याबाबत प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही , असा उल्लेख त्या पत्रात करण्यात आला आहे.