लाच-लुचपत/लाचखोर
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला अटक- कोकरेची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त
नागपूर- बिअर बार परवान्यासाठी सव्वातीन लाखांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. रवींद्र लक्ष्मण कोकरे (४९) असे लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार युवकाला बिअर बार सुरू करायचा त्यासाठी एफएल-३ परवाना परवाना हवा होता. त्या युवकाने आवश्यक ती सर्व कागदपत्र पूर्ण करून टी फाईल रवींद्र कोकरे यांच्याकडे अर्ज केला. ती फाईल मंजूर करून अधीक्षकांकडे पाठविण्यासाठी कोकरेने चार लाखांची मागणी केली. तक्रारदार तरुणाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लेखी तक्रार केली. एसीबीने या तक्रारीची शहानिशा करीत
गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ट्रैफिक पार्क येथे सापळा रचला. चार लाखांऐवजी सव्वातीन लाखात काम करण्याची कोकरेने तयारी दाखविली. ट्रैफिक पार्कजवळ तरुणाकडून लाच घेताना कोकरे याला एसीबीच्या पथकाने अटक केली. दरम्यान दुसऱ्या पथकाने कोकरेच्या घराची झाडाझडती घेतली. पोलिस निरीक्षक प्रवीण लाकडे, सारंग बालपांडे, अस्मिता मेश्राम, विकास सायरे, राजू जांभूळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोकरेची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू होती.