बीड – बीड लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात मतदान झाले.लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यानी या प्रकरणी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी शनिवारी 2 व्हिडिओ ट्विट करत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोग या प्रकरणी चौकशी करणार की केवळ विरोधकांवरच आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानणार? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
त्यात परळी तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर सत्ताधारी भाजपने बोगस मतदान केल्याचा आरोप आहे. रोहित पवार या प्रकरणी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान व मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिंमत बबन गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली.
निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की, फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे ? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या दोन्ही व्हिडिओत बबन गीते हे मतदान केंद्रातील कथित गैरप्रकाराबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरताना दिसत आहेत.
दरम्यान बीड लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीही परळीमध्ये अनेक बूथ सत्ताधारी पक्षाकडून ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणी 19 गावांमध्ये फेरमतदान घेण्याचीही मागणी केली आहे.बीड लोकसभा साठी मतदारसंघातील मतदान- बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेला मतदार संघ प्रमाणे झालेले मतदान आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 74.19 टक्के मतदान झाले आहे, तर तुलनेत कमी मतदान बीड मध्ये 66.09 टक्के मतदारसंघात झाले. गेवराई मतदार संघामध्ये 71.43 टक्के, केजमध्ये 70.31 टक्के, माजलगावमध्ये 71. 61 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. परळीमध्ये 71.31 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या मताचा टक्का कोणाला धक्का देणार? याची चर्चा बीडच्या राजकारणामध्ये रंगली आहे.