बीड लोकसभा निवडणूक २०२४
बोगस मतदान, बूथ कॅप्चरिंग, धमकावणे आदि आरोपानंतर बीड प्रशासन
बीड- : जिल्ह्यात बूथ कॅप्चरिंग, बोगस मतदानाच्या घटना घडल्या नसल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाला सोमवारी पाठविला आहे. कुठल्याही केंद्राध्यक्षांनी बूथ ताब्यात घेतल्याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद केलेला नाही वा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तसे कळविलेले नाही. त्यामुळे बोगस मतदान व बूथ ताब्यात घेण्याचा प्रकार घडला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. इतर ठिकाणच्या तुलनेत अधिक मतदान होणे, मतदान केंद्राध्यक्षांकडून बूथ कॅप्चर झाले किंवा बोगस मतदान झाले याची नोंद झाल्यानंतर बोगस मतदान झाल्याचे मानले जाते. असे प्रकार आढळले नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी परळी तालुक्यातील इंजेगाव, सारडगांव, धर्मापुरी, डिग्रस, नाना, कौडगाव, सावळा, जिरेवाडी, वालेवाडी व कन्हेरवाडी गावातील बूथ क्रमांक १८८, १८९, १३२, १६१ तसेच केज तालुक्यातील देवगाव, लाडेगाव, माजलगाव मधील गोविंदवाडी, त्याच बरोबर धारूरमधील सोनीमोहा, पिंपरवाडा, मैदवाडी व चाडगाव, आष्टी मतदार संघातील वाली व वाधिरा या गावांतील बूथ ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचा आरोप केला होता.
आता रोहित पवारांनी देखील आपल्या ‘एक्स’ सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत बोगस मतदानाचे व्हिडिओ पोस्ट करून बूथ कैप्चर करून बोगस मतदानाचा आरोप केला आहे. असेच प्रकार सुरू राहिले तर भविष्यात महाराष्ट्राचा बिहार व उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही बुथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नसल्याचा गंभीर आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला होता.