लाच लुचपत –
माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी येथील अभियंत्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
बीड /परळी वैजनाथ :- तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी २८ हजारांची लाच स्वीकारताना माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी येथील कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. राजेश आनंदराव सलगरकर असे कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.२२रोजी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील त्यांचे 5 सहकारी शेतकरी यांनी चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी माजलगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. सलगरकर यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना गाळ व माती काढण्याची परवानगी देण्यासाठी प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ शेतकऱ्यांकडे ३५ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती २८ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यावरुन आज माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी वैजनाथ येथील कार्यालयात एसीबीने सापळा रचला. सलगरकर यांनी पंचा समक्ष लाच रक्कम २८ हजार स्वीकारताच लाच रकमेसह त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनूस शेख, पर्यवेक्षण अधिकारी शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवड, सुरेश सांगळे, श्रीराम गिरम , अविनाश गवळी, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, स्नेहल कुमार कोरडे, गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.
◾जिल्ह्यात लाच नघेणारा दुर्मिळ, अनेकांनी जमवली कोट्यवधींची माया,मोठे राजकीय पाठबळ.
बीड जिल्हा हा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा गड झाला असून प्रारंभी जिल्ह्यात येण्यास नको म्हणणारे येथे येऊन प्रत्येक कामासाठी पैसे घेऊन गब्बर झाले आहेत. दिवसेंदिवस निगरगट्ट अधिकारी व त्यांना मिळत असलेला राजाश्रय यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अक्षरशा अडवणूक करून पैसे मागितले जातात. बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून विविध विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. यातून कोट्यावधी रुपयांची माया यांनी जमा केली आहे. हे अधिकारी राजसत्तेच्या जीवावर गोरगरिबांचे अक्षरशः शोषण करत असल्याचे विदारक चित्र आहे.