परळी बस स्थानकातील उपहारगृह ४ वर्षापासून बंद

नागरी सुविधा /
बस स्थानकाचे पुनर्बांधणी काम ही रखडलेलेच

बीड /परळी वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क  परळी शहरातील बस स्थानकाचे पुनर्बांधणी काम गेल्या सहा-सात वर्षापासून रखडलेलेच आहे. दरम्यान गेल्या चार वर्षापासून बस स्थानकावरील उपहारगृह बंद आहे. यामुळे स्थानकावरील प्रवासी नागरिकांना अत्यावश्यक वेळी मिळणारा चहा -नाश्त्याची सुविधा बंद आहे. त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रवाशांना बसस्थानका बाहेर येऊन चहा घ्यावा लागतो आहे.

परळी शहरातील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या भूमिपूजन कार्यक्रमला येत्या १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर स्थानकात असलेले उपहारगृही मागील चार-पाच वर्षांपासून बंद स्थितीत आहे. उपहारगृहाची मोठी दैना झाली असून त्याच्या सर्व खिडक्यांची काचेची तावदाने गळून पडले आहेत, मोठ्या प्रमाणात घाण आणि उपहारगृहाच्या भिंतीला मूत्रालयाचे स्वरूप आले आहे. उपहारगृहाच्या एका बाजूस मोठे वृक्ष भिंतीवरच वाढले ही आहेत याकडेही कोणी कधी लक्ष दिले नाही हे दुर्दैव आहे.

तत्कालीन परिस्थितीत ५ कोटी ४५ लाख रुपये एवढा मोठा निधी परळी-वैद्यनाथ बस स्थानकाच्या पुनरबांधणी बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेला होता. आता बजेट वाढत जाऊन सुमारे 25 कोटी पेक्षा पुढेही गेल्याची चर्चा आहे.
मागील सरकारच्या कालावधीत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन केले गेले. परळी बस स्थानकाचा विकास मात्र अजूनही प्रतीक्षेतच आहे. सरकार बदलूनही अजूनही बसस्थानकाच्या कामाबद्दल असलेली सरकारी अनास्था आजही कायम आहे की काय असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

दरम्यान पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे तत्कालीन सरकारात सामाजिक न्याय मंत्री ही होऊन गेले. आता ते राज्याचे विद्यमान कृषी मंत्री आहेत यांनी आपल्या मतदारसंघातील बसस्थानक पुनर्बांधणीसाठी लक्ष घालावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

………………………………..
बस स्थानकातील उपहारगृह मागील चार वर्षापासून बंद आहे. ते सुरू करण्याबाबत निविदा प्रक्रिया केली होती मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उपहारगृह बंद आहे. आता बस स्थानकाचा पुनर्निर्मितीच्या कामात त्याचा विचार होईल .

संतोष ना. महाजन
डेपो मॅनेजर,परळी बस स्थानक