
🔺पाणीसंकटः
🔷 वीजनिर्मितीवर सध्या परिणाम नाही
सातारा – राज्यातील अनेक मध्यम प्रकल्पात पाणी साठा संपला असून लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला शनिवारपासून जून प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणामुळे यंदा पुर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोयना धरणाचं १ जून ते ३१ मे हे तांत्रिक वर्ष आहे. कृष्णा पाणी वाटप तंटा लवादानुसार १ जून पासून ६७.५ टीएमसी एवढा पाणीसाठा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आरक्षित होतो. उर्वरीत पाणीसाठा हा पुर्वेकडील सिंचन आणि पिण्यासाठी दिला जातो. धरण व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन हे अनेकदा यशस्वी ठरलं आहे. मागील वर्षी देखील मे महिन्याच्या अखेरपर्यंत धरणात १७ टीएमसी पाणी शिल्लक होतं. त्या तुलनेत यंदा केवळ अर्धा टीएमसी पाणी कमी आहे.
कोयना धरणात शनिवारी (दि. १ जून) रोजी एकूण १७.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यातील ५.१२ टीएमसी पाणीसाठा हा मृत मानला जातो. त्यामुळे १२.४६ इतका निव्वळ पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पायथा वीजगृहातील दोन युनिटमधून वीजनिर्मिती करून २१०० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वीजनिर्मिती देखील पूर्ण क्षमतेनं सुरू आहे. पाऊस लांबला तरी कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल. वीजनिर्मितीवर देखील परिणाम होणार नाही, अशी माहिती कोयना धरणाचे अधीक्षक अभियंता नितीश पोतदार यांनी दिली.

