🔶 रक्तदात्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव 🔶 ९ वेळा रक्तदान करणाऱ्या पत्रकार रक्तदात्या शेख आयेशा जिल्हा शल्य चिकित्साकडून सन्मानित
बीड /एम एन सी न्यूज नेटवर्क जागतिक रक्तदाता दिनानिमित्त शासकीय जिल्हा रुग्णालय बीड येथील कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांनी नऊ वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्या पत्रकार शेख आयेशा यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, झाड भेट देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड येथील शासकीय जिल्हा रुग्णालय येथे शुक्रवार दिनांक 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागेश चव्हाण यांच्यासह डॉक्टर देशपांडे, डॉक्टर फटाले, डॉक्टर माजेद, डॉक्टर धुत, डॉक्टर नाईकवाडी मॅडम, डॉक्टर कट्टे मॅडम, रक्तपेढीचे श्री काळे सर यांच्यासह पत्रकार संघाचे वैभव स्वामी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे महेंद्र मुधोळकर, ज्ञानोबा वायबसे, नयना भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे म्हणाले, महिला शक्यतो रक्तदान करत नाहीत. रक्तदान करण्याबाबत अनेकांच्या मनामध्ये भीती असते.वास्तविक रक्तदान केल्याने शरीराचे काहीही नुकसान होत नाही.उलट फायदे होतात. समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी पत्रकार शेख आयेशा यांच्यासारखे रक्तदाते पुढे येणे काळाची गरज आहे. त्या अल्पसंख्यांक असताना सुद्धा त्यांनी आज पर्यंत नऊ वेळा रक्तदान करून खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यातील महिलांसमोर एक आदर्श उभा केला आहे. त्यांच्या रक्तदानाची सामाजिक भूमिका लक्षात घेऊन आज जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने त्यांचे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,वृक्ष देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून इतर महिलांनी देखील रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नाईकवाडे मॅडम यांनी केले. तर आभार डॉक्टर कट्टे मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमात इतरही रक्तदात्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला आरोग्य प्रेमी नागरिक,वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी रक्तदान करणार अशा स्वरूपाची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.