कारचालकाने भाजी विक्रेत्यांसह 5 जणांना उडवले
नागपूर – राज्यातील हिट अँड रण प्रकरणात मोठी वाढ होत असून बेदरकार पणे वाहन चालविण्याचा प्रकार मोठता प्रमाणांत वाढला आहे.पुण्यातील कल्याणीनगरमध्ये वेदांत अग्रवाल (वय १७) नामक अल्पवयीन मुलाने त्याच्याकडे असलेल्या पोर्शे कारखाली एका तरुणाला आणि एका तरुणीला चिरडले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता नागपुरातही गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नंदनवन परिसरात केडीके कॉलेजजवळ जनता गॅरेज आहे. येथे एमएच २५, आर ३९२९ क्रमाकांची स्कोडा गाडी नेहमी गॅरेज जवळ उभी असते. गॅरेज मालकाने अल्पवयीन मुलास गाडी बाजूस घेण्यास सांगितले मुलाने गाडी बाजूला गाडी घेऊन बाजूला लावण्याऐवजी रस्त्यावर घेऊन आला यात गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
शनिवारी दुपारी वर्दळीचा परिसर असलेल्या नंदनवन परिसरातील केडीके कॉलेजजवळ भाजी विक्रेते निवांत होते. काही लोकही चौकात उभे असतानाच भरधाव स्कोडा कार आली आणि काही कळण्याच्या आतच या कारने पाच जणांना उडवले. अपघातानंतर लोकांनी कारचालक मुलाला पकडून मारहाण सुरू केली. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला ताब्यात घेतले.
या संदर्भात डीसीपी झोन-४ विजयकांत सागर यांनी दिलेल्या माहिती नुसार गाडी चाळवणाऱ्या मुलाचा पाय ब्रेक ऐवजी क्लचवर पडल्याने गाडीने वेग घेतला. त्यातच त्याचे नियंत्रण सुटल्याने तीन भाजी विक्रेत्यांसह एक दाम्पत्य जखमी झाल्याचे सांगितले. अपघात करणारा मुलगा नंदनवन चौकातील जनता गॅरेजमध्ये काम करतो. या प्रकरणी भादंवि कलम २७९ म्हणजे निष्काळजीपणाने गाडी चालवणे व कलम ३३८ म्हणजे गंभीर दुखापत करणे, तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.