आत्महत्याग्रस्त तरूणांच्या कुटुंबाचे अश्रू पुसताना पंकजाताई मुंडेंनाही अश्रू अनावर !

🔺काळजी करू नका, तुम्हाला आधार देईल ; पोपट वायबसेच्या परिवाराला दिला धीर

🔶 पुन्हा एकदा माझी विनंती आहे, स्वतःचा जीव देवू नका; तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवायं तर मलाही हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवायं

बीड दि १६ ।- पराभव जिव्हारी लागल्याने आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुंबियांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व धीर दिला. यावेळी पीडितांच्या परिवाराचे अश्रू पुसताना पंकजाताई यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. काळजी करू नका, तुम्हाला आधार देईल अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या मुला बाळांना धीर दिला. तरुणांनी केलेल्या आत्महत्यांनी मी हादरून गेले आहे, मला अपराधी असल्यासारखे वाटत आहे. बाळांनो, स्वतःचा जीव देवू नका. तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवाय तर मलाही हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवाय अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट वायबसे या तरूणाने नुकतीच आत्महत्या केली होती. पंकजाताई मुंडे यांनी आज चिंचेवाडीत जाऊन वायबसे कुटुंबाची भेट घेतली. पंकजाताईंना पाहतांच वायबसे यांच्या पत्नी व मुलांनी टाहो फोडला, त्यांचे दुःख पाहून पंकजाताईंनाही आपले अश्रू रोखता आले नाहीत. अशा परिस्थितीत स्वतःला सावरत त्यांनी धीर दिला.

हया घटना धक्कादायक; मी हादरून गेलेयं

यावेळी माध्यमांसमोर बोलतानाही पंकजाताईना आपले अश्रू रोखता आले नाहीत. त्या म्हणाल्या, पराभव झाला म्हणून जीव देणे मला अजिबात मान्य नाही. गेली अनेक वर्षे मी राजकारणात आहे पण स्वतःचे संतुलन कधी बिघडू दिले नाही. स्वतःला कधी कमकुवत केले नाही. पण अशा घटनांनी मात्र मी कमकुवत झाले. मला अपराधी वाटतेय की माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देवू शकत नाही. राजकारणात जय पराजय असतो. अनेक मोठ्या नेत्यांचे पराभव झाले पण हा पराभव जिव्हारी लागण्याचे कारण म्हणजे आताची परिस्थिती आहे. लोकांनी एखाद्या नेत्यावर इतकं प्रेम करू नये की, त्याला स्वतःचा जीव द्यावा लागेल. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, स्वतःचा जीव देवू नका. तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवाय तर मला सुध्दा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवाय. मला हे लोकं गमवायचे नाहीत. पराभवाने मी खचणारी नाही पण अशा घटना मला हादरून टाकतात. मी आज खूप अस्वस्थ आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
••••