वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास : परळी शहरातील नियोजित चारही स्वागत कमानींचे काम तातडीने सुरू करा – धनंजय मुंडे
बीड/परळी वैद्यनाथ – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 286.68 कोटी रुपये मंजूर असून यातून आतापर्यंत मिळालेल्या रकमेतून परळी शहरात नियोजित चार ठिकाणी स्वागत कमान उभारणे अपेक्षित असून या चारही स्वागत कमानींचे काम तातडीने सुरू करावे, असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी सायंकाळी संपन्न झालेल्या बैठकीत संबंधितांना दिले आहेत.
वैद्यनाथ मंदिराच्या भोवताली असलेल्या मेरू पर्वत प्रदक्षिणा मार्गाचे रस्ता रुंदीकरण, नाली, पेवर ब्लॉक तसेच संपूर्ण शेडच्या कामाला गती देऊन हे काम दोन महिन्यांच्या आत पूर्ण केले जावे असेही यावेळी धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्या संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली परळी येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, अभियंता श्री बेंडले, आर्किटेक्ट श्री बांगड, यांसह संबंधित अधिकारी, तंत्रज्ञ आदी उपस्थित होते. लेझर लाईट शो यासह विविध इलेक्ट्रिक कामांसाठी जवळपास 62 कोटी रुपयांच्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता येत्या दोन दिवसात मिळणार असून आता त्या कामांनाही गती देण्यात येणार असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.
वैद्यनाथ मंदिरापासून जवळच असलेल्या शासकीय 22 एकर जागेमध्ये आयुर्वेद पार्क उभारणे प्रस्तावित आहे. यासाठी संबंधित शासकीय जागा महसूल विभाग नगर परिषदेस उपलब्ध करून देईल, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ – मुंडे यांनी दिली. तसेच वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत निधी प्राप्त झालेली कामे कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्यात यावीत, असे सक्तीचे निर्देश देखील श्रीमती दीपा मुधोळ यांनी दिले आहेत.
मंदिर परिसरातील दर्शन रांग, दर्शन मंडप, पायऱ्या यादेखील कामांना आता वेगाने पूर्ण केले जावे. तसेच हे काम उत्कृष्ट दर्जाच्या दगडामध्ये पूर्ण केले जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मंदिरातील नंदी, त्रिशूल, कळस हे कोणत्या पद्धतीने उभारले जावे, त्यासाठी कोणता दगड वापरावा इत्यादी विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.