लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाविषयी सरकारने भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी – पंकजाताई मुंडे

🔺पंकजाताई मुंडे यांची सरकारकडे पत्राद्वारे मागणी

🔻मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी उपोषणाला भेट द्यावी ; भेट देणंही तेवढचं महत्वाचं

मुंबई ।दिनांक १९। ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलना विषयी राज्य सरकारने आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सरकारकडे एका पत्राद्वारे केली आहे. हाके यांच्या उपोषणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी भेट देऊन त्यांचं म्हणण ऐकून घ्यावं, ही भेटही तेवढीच महत्वाची आहे, असं त्यांनी या तिघांनाही पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे की, ओबीसी आरक्षणा संदर्भात प्रा. लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडीगोद्री जि. जालना येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत, त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाही, त्यांनी पाणी देखील बंद केले आहे. शासनाची भूमिका ही सर्व आंदोलनांना सारखीच असली पाहिजे. श्री हाके यांच्याबाबत प्रमुख मंत्र्यानी तसेच आपण स्वतः गांभिर्याने लक्ष तर द्यावेच याशिवाय उपोषणास भेट देऊन सन्मान द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. ते अत्यंत संयमाने आणि सर्वांना सन्मानाने वागवत आहेत हे कौतुकास्पद आहे. त्यांचं आणि सर्व ओबीसी नेत्यांचं आवाहन देखील सकारात्मकच आहे. “कोणीही कुठल्याही प्रकारे नकारात्मक गोष्टी करू नयेत, कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये” असंच आवाहन ते करत आहेत म्हणजे व्यवस्थेचा सन्मानच करत आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे तात्काळ लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे.

इथे प्रश्न समान न्यायाचा आहे, म्हणणे ऐकून कायद्याने निर्णय घ्यावा अशी आवश्यकता आहे. आपण व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने या आंदोलना विषयीची आपली भूमिका जाहीर स्पष्ट करावी व तिथे भेट द्यावी अशी आपणास माझी विनंती आहे.