🔺कृषी/बीभरण/पेरणी
🔶 ऐन पेरणीच्या दिवसांत बीड जिल्ह्यातील बळीराजा आर्थिक संकटात!
बीड/परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क -मागील दोन वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी संकट एकामागून एक आल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता पेरणीचे दिवस आहेत. काही ठिकाणी पाऊस पडतोय तर काही ठिकाणी आणखीही पाऊस पडलेला नाही. म्हणावा असा पाऊस अद्याप पडलेला नसल्याने पाण्याचे दुर्भिक्ष अद्यापही संपलेले नाही. खते आणि बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. याकडे शासन, प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असून, मागील वर्षीच्या पीक विम्याची उर्वरित 75 टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी तसेच पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गित्ते यांनी केली आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून शेतकऱ्यांवर संकट एकामागून एक येत आहेत. शासनाने मागील वर्षीचा मंजूर झालेल्या पीक विमा रकमेतील 25 टक्क्यांचे अग्रिम दोन टप्प्यात वाटप केले. मात्र उर्वरित 75 टक्के रक्कमेतून एकही रुपया दिलेला नाही. झालेच तर अनेक बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देतांना अडवणूक करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक संकटात आलेल्या बळीराजाने पेरणीसाठी पैसा कोठून आणायचा असा सवाल बबन भाऊ गित्ते यांनी उपस्थित केला आहे.
बँकांनी अडचणीतील असलेल्या शेतकऱ्यांकडे थकीत कर्जासाठी तगादा लावू नये, त्यांना काही दिवसांची मुदतवाढ द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. राज्याचे कृषिमंत्री या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल न देता आत्मीयतेने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.