२५ ते ३० जून या कालावधीत शाहू जयंती सप्ताह साजरा होणार
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे १५ कोटींचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त, वर्षभर भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून शाहू विचारांचा जागर, तर २५ ते ३० जून या कालावधीत शाहू जयंती सप्ताह साजरा होणार आहे.
काही दिवसा पूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पालकमंत्री मुश्रीफ, खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थिती होती.
शाहूप्रेमींनी बैठकी दरम्यान अनेक सूचना मांडल्या. या मध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शाहू विचारांचा जागर
करण्यासाठी ठिकठिकाणी व्याख्याने घ्यावीत,सहभागातून प्रभात फेरी, शोभा यात्रा, शाहूरायांचा जीवनपट दाखवणारा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवण्याचे नियोजन करावे,सर्व भाषांमध्ये शाहू महाराजांचे जीवनचरित्र प्रसिद्ध करावे, आदि सूचना आल्या तसेच या सर्व कार्यक्रमाचे शासन स्तरावरून नियोजन व्हावे, शाहू मिल विकास आराखडा राबवावा,इत्यादि
महाराष्ट्र राज्य शासनाने दिल्ली येथे शासकीय शाहू जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे नियोजन करून तो करावा, अशी सूचना खासदार शाहू महाराज यांनी मांडली. वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. दरम्यान राजर्षी शाहूमहाराजांचा जयंती उत्सव जनतेने सहभाग घेऊन साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.