परळीत जेसीबी आडवे लाऊन रोखला राष्ट्रीय महामार्ग ;ओ बी सी आंदोलन

शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी सुमारे तासभर रोखून धरला. वाहतुकीची मोठी कोंडी 

बीड /परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क:-वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठीक ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून निदर्शने करण्यात येत आहेत. परळी येथेही सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने इटके कॉर्नर येथे बीड व परभणीकडील राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर जेसीबी लावून तसेच थर्माकोल जाळून रास्ता रोको आंदोलन दि.21 जून 2024 रोजी करण्यात आले.

परळी तालुक्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असून दरम्यान शिरसाळा येथे ही आंदोलन करण्यात आले. परळी येथे छत्रपती संभाजी महाराज चौक (इटके कॉर्नर) मार्गावर रास्ता रोको करत राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी सुमारे तासभर रोखून धरला. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे.त्यामुळे हाके यांची तब्येत खालावत चालली आहे. मात्र असं असलं सरकार अद्याप निर्णय घेत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांनी आक्रमक होत परळी-बीड,परळी परभणी महामार्गावर अचानक रास्ता रोको केला. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आंदोलकांनी थेट रस्त्यावर थर्माकोल जाळले तसेच जेसीबी आडवा लावला.

या प्रसंगी आंदोलकांनी गोपीनाथ मुंडे अमर रहे… अमर रहे… धनंजय मुंडे जिंदाबाद … पंकजाताई मुंडे तुम आगे बढो… मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये!,  आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अशा घोषणा देत सकल ओबीसी समाज आक्रमक झाला होता. यावेळी आंदोलकांनी संत भगवान बाबा, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक आदी च्या प्रतिमा तर ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे यांचे छायाचित्र याप्रसंगी हातात घेतले होते. या रस्ता रोको मुळे शिरसाळा, बीड,अंबाजोगाई, नागपूर,नांदेड परभणी, सोनपेठकडे जाणाऱ्या वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.  वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

………………………………………………………………………….

तगडा पोलीस बंदोबस्त
सकल ओबीसी समाजाच्या वतीने लक्ष्मण हाके यांनी सुरू असलेल्या अमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर परळी येथे छत्रपती संभाजी महाराज चौकात अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे वाहतूक व्यवस्था बिघडली होती. या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबाजोगाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या प्रसंगी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय गित्ते यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…………………………………………………………………………..