बैलांच्या जागी मुलांना कोळप्याला जुंपले होते; धनंजय मुंडेंनी हिंगोलीच्या त्या शेतकऱ्यास बांधावर पोहोच केली बैलजोडी
कृषी विभागाकडून लवकरच ट्रॅक्टरही देणार – मुंडेंनी शेतकरी बालाजी पुंडगे यांना अर्ज करण्यास सांगितले
मुंबई (दि. 27) – शेतात हळद लावण्यापूर्वी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी आपल्याकडे बैल जोडी नाही म्हणून भावाला व आपल्या मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बालाजी पुंडगे यांना आज त्यांच्या बांधावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैल जोडी भेट पाठवली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याला दोन एकर शेती आहे. पण दोन एकर शेतीसाठी बैल जोडी घेणे परवडत नाही आणि ऐन वेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाई गडबडीत सरी काढण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती
धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील आपले सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष बी.डी. बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले. पुंडगे परिवाराच्या आनंदाला यावेळी सीमा उरली नव्हती.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला, यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैल जोडी पाठवत असून शेतातील कामांसाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टर साठी देखील अर्ज करावा, असे बालाजी पुंडगे यांना म्हटले. तर बालाजी पुंडगे यांनी सुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्ये सुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा सांभाळ करू; असा शब्द धनंजय मुंडे यांना दिला. यावेळी बी.डी.बांगर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी हे शिरळे गावात उपस्थित होते.