आधार गरजवंतांचा या उपक्रमांतर्गत मदत
बीड/परळी वैजनाथ /एमएनसी न्यूज नेटवर्क – भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने येथील श्रद्धा मंगल कार्यालयात रविवारी (ता.२३) रोजी गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दहावी, बारावी तसेच इतर विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलदैवत हिंगलाज माता आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी भावसार युवासेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विलास सुत्रावे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख मार्गदर्शक गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या मधील विविध क्षमता ओळखल्या पाहिजेत, स्वतःमधील वेगळेपण शोधून त्या क्षमतांचा विकास करून जीवनात यश मिळवले पाहिजे असे सांगितले. रुळलेल्या आणि मळलेल्या वाटांवरून सर्वच जण चालतात परंतु स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणे फार कमी लोकांना जमते, आपणही आपल्या यशाचा मार्ग स्वतः तयार करणे गरजेचे असल्याचे गणेश शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधीज्ञ सुनील काकडे, प्रमुख उपस्थितीमध्ये माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपा बंग, जिल्हाध्यक्ष प्रकाश कानगावकर, परळीचे अध्यक्ष प्रभाकर हजारे, महिला अध्यक्ष सारिका तांदळे, मार्गदर्शक व्याख्याते गणेश शिंदे उपस्थित होते. दीपा बंग यांनी समाजातील मुलींनी शिक्षण घेऊन प्रगती करावी मात्र अवास्तव अपेक्षा बाळगून आयुष्य कठीण करू नये. येथील भावसार समाजाची पहिली महिला एम बी बी एस एम.डी. डॉ पूजा बंडू हजारे व डॉ अश्विनी अनिल सुत्रावे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्य उपक्रमा अंतर्गत येथे भव्य शोभायात्रा काढल्याबद्दल लोकोत्सव समितीचा सन्मानपत्र, हिंगलाज मातेची प्रतिमा व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
आधार गरजवंतांचा या उपक्रमांतर्गत अपसिंगेकर यांना संस्थेमार्फत शिलाई मशीन देण्यात आली. अँड सुनील काकडे यांनी अध्यक्षीय समारोप केला तर प्रसाद गरुड यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सुरवसे व तानाजी देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाळ कंकाळ, शैलेश वैजवाडे,अजिंक्य गरुड, दत्ता बुलबुले, जय हंबीरे, प्रमोद पाखरे, कृष्णा बेदरकर, मनोज वायचळे, गोविंद खपले, कृष्णा बरडे, अभिषेक वळसे, रवींद्र यलशेटे,कृष्णा न बेदरकर व भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले.