पंकजाताई मुंडे विधानपरिषदेवर ; परळीसह जिल्ह्यात फटाक्यांची आतिषबाजी

गुलालाची उधळण, फटाक्याचे आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव

बीड/ परळी वैजनाथ।दिनांक०१।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याचे समजताच परळीसह संपूर्ण जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह यावेळी पहावयास मिळाला.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली, यादीत पहिल्या क्रमांकावर पंकजाताई मुंडे यांचे नाव जाहीर होताच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टाॅवर, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पंकजाताईंच्या यशःश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच गुलाल उधळून एकच जल्लोष केला. जिल्ह्यात बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, अंबाजोगाई आदींसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाजतगाजत पेढे वाटून आनंद व्यक्त केला.