नीट पेपर फुटी प्रकरण; आरोपींना सीबीआय कोठडी

अन्य स्पर्धा परीक्षेतही गैरप्रकार केल्याचा पोलिसांना संशय आहे;  संदर्भ सापडल्याची चर्चा

लातूर- सी बी आय ने नीट पेपर फुटी प्रकरणी ताब्यात असलेल्या दोन आरोपींना  सीबीआयने ताब्यात घेतले असून या आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी (दि. २) संपत असल्याने पुन्हा त्यांना येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले.   न्यायालयाने त्यांना ६ जुलै पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता सीबीआय करीत असून दिल्ली येथून सीबीआयचे दोन वरिष्ठ अधिकारी शनिवारी लातूर शहरात दाखल झाले होते. रविवारी त्यांनी पोलिस अधिक्षक तसेच तपासाधिकाराऱ्यांकडून लातूर येथील या प्रकरणाचा तपशिल विस्ताराने जाणून घेतला होता.  पोलिस कोठडीत असेलेले आरोपी जलिलखाँ उमरखाँ पठाण व संजय तुकाराम जाधव यांचा ताबा मिळाल्यानंतर या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा विविध अंगानी तपास करण्यासाठी व यात गुंतलेले अन्य लोकापर्यंत पोहचण्यासाठी आरोपींना सीबीआय कोठडी देण्याची विनंती न्यायालयास केली.

त्यावरुन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. एन. चव्हाण यांनी ६ जुलै पर्यंत आरोपींना सीबीआय कोठडी सुनावली, दरम्यान या प्रकरणाचा विस्तार मोठा असून नीट परीक्षे शिवाय अन्य स्पर्धा परीक्षेतही आरोपींनी गैरप्रकार केल्याचा पोलिसांना संशय आहे. तसे काही संदर्भ सापडल्याची चर्चा आहे त्या पार्श्वभूमिवरही सीबीआय तपास करण्याची शक्यता आहे.