नीलकंठेश्वर मंदिर सिंदखेडराजा

🔷 पर्यटन/पुरातन मंदिरे/ प्राचीन/निसर्ग/भ्रमंती/ छायाचित्र 
– नमिताप्रशांत
सिंदखेडराजा- साधारणतः अकराव्या शतकातील अतिशय प्राचीन असे हे “नीलकंठेश्वर मंदिर”…..या मंदिराचा जीर्णोद्धार राजे लखुजीराव जाधव यांनी केला. येथे या मंदिरात हरिहराची एक सुबक मूर्ती आहे. मूर्तीचे उजवी बाजू शंकराची तर, डावी बाजू विष्णूची आहे. मंदिरातील वातावरण अतिशय प्रसन्न असून आतून मंदिर स्वच्छ आहे. येथे एक भुयारी मार्ग असून संन्यस्थ खोलीदेखील आहे. येथे स्वच्छता ठेवणाऱ्या काकांनी आम्हाला सांगितले की, ‘अयोध्येतील सध्यास्थित श्रीरामाची मूर्ती याच हरिहराच्या मूर्तिहून घेण्यात आलेली आहे.
आधी या मूर्तीची पाहणी झाली होती.’ खरं काय खोटं काय… ते ज्या आत्मीयतेने सांगत होतें, तो भाव जास्त महत्वाचा वाटला त्यामुळे… वाह वाह म्हणत त्यांचं ऐकून घेणं कुठल्याही शहानिशापेक्षा आनंददायी होतं.
नीळकंठेश्वर मंदिराजवळच अत्यंत अस्वच्छ अवस्थेत एक बारवदेखील आहे. बारवजवळ ग्रामस्थ जादा फिरकत नाहीत. मंदिराबाहेर बसलेल्या आजोबांनी बसल्याबसल्या प्रशांत आणि गजूला भरपूर गोष्टी सांगितल्यात. त्यापैकी या बारवशी संबंधित असणारी गोष्ट जरा धक्कादायक होती, त्यांच्या म्हणण्यानुसार… बारव अतिशय खोल असून आजवर खूप जणांनी येथे आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. त्यामुळेच हिची अशी अवस्था…
पहिले या बारवेच्या चारही बाजूना तीन तीन असे बारा शिवलिंग होतें. त्यांना बारा जोतिर्लिंग संबोधित.
आज मात्र तीनच शिल्लक आहेत. असो,…
नीलकंठेश्वर मंदिर एक प्राचीन वास्तू असून सुंदर आहे.. आणि उपेक्षितही… हे नव्याने नको सांगायला
– नमिताप्रशांत