काहीही झाले तरी विधानसभा निवडणूक लढवणार

राजेभाऊ फड यांची पत्रकार परिषदेत घोषणा

बीड परळी वैजनाथ एमएनसी न्यूज नेटवर्क -राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या भेटी घेऊन परळी विधानसभा निवडणूक लढविण्याची मी मागणी करणार असून, काहीही झाले तरी परळी विधानसभा निवडणूक आपण लढविणारच अशी घोषणा जेष्ठ नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेभाऊ फड यांनी केली. सोमवारी परळी वैजनाथ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना राजेभाऊ फड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या उद्यापासून भेटी घेणार असून, परळी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी मी मागणी करणार आहे. मागील काळात विकासाच्या फक्त गप्पा मारण्यात आल्या मात्र प्रत्यक्षात विकास केला गेला नाही.

या विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी राजकारणात येत आहे. बारामतीच्या धर्तीवर परळीचा आम्ही विकास करून दाखवू अशीही घोषणा त्यांनी केली. जर यात कोणी काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. परळीला आता मला भयमुक्त करायचे आहे, जनतेच्या डोळ्याला दिसेल असा विकास करून दाखवायचं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवण्याचा आपला ठाम निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले