कोल्हापुरात पंचगंगा नदी धोक्याच्या पातळी कडे 

जिल्ह्यात पावसाची हजेरी अनेक बंधारे भरले

कोल्हापूर | काही काळ घेतलेल्या विश्रांतीनंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.   जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली असून पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीचा राजाराम बंधारा पाणीपातळी ३३.०७ फूट आहे आणि विसर्ग ३१५५६ क्युसेक सुरू आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ व धोका पातळी ४३ आहे. जिल्ह्यातील ५७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. शहरात दुपारपर्यंत पावसाने उसंत दिली.

जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील गवशी बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. जलसंधारण विभागाकडील शाहुवाडी तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव भंडारवाडी, बुरमबाळ, इजोली, बर्की, वाकोली, येळवण, जुगाई, आयरेवाडी, गावडी पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत व सर्व धरणे सुस्थित आहेत. राधानगरी तालुक्यातील असणे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.