स्वाराती रुग्णालयाला मिळणार सीटी स्कॅन मशीनसाठी १५ कोटी रुपयांचा निधी

🔺आरोग्य सेवा

बीड-अंबाजोगाई : जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि अधिक आरोग्य सेवेसाठी शेजारील जिल्ह्यातील रुग्णासाठी महत्त्वाचे असलेले  श्री स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नवीन सीटी स्कॅन मशीनसाठी राज्य शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गत कित्येक महिन्यांपासून रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेत आणि स्थानिक आमदार नमिता मुंदडा यांचा पाठपुरावा यामुळे शासनाने मंगळवारी निधी मंजुरीचे आदेश काढले.

अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात अत्यल्प दरात अद्ययावत यंत्रसामुग्री द्वारे तपासणी करून उपचार होत असल्याने येथे रुग्णांची शेजारील अनेक जिल्ह्यातील रुग्णांची मोठीगर्दी येथे असते. परंतु येथील सीटी  स्कॅन मशीन मागील कित्येक महिन्यांपासून बंद  होती.दरम्यान तिची दुरुस्ती करून घेतल्याने  अत्यवस्थ रुग्णांची गैरसोय काही प्रमाणात कमी झाली होती.

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने राज्य योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून स्वाराती रुग्णालयात १२८ स्लाइस सीटी स्कॅन मशीन खरेदीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. लवकरच निविदा प्रक्रिया पार पाडून नवीन मशीन येणार असल्याने रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.