18 पगड जातींच्या गराड्यातला ‘जगमित्र’…!

🔺मा श्री धनंजय मुंडे (कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त लेख..

आज-काल महाराष्ट्रात व विशेष करून आपल्या मराठवाड्यात माणसाचे नाव घ्यायच्या आधी त्याची जात माहित केली जाते. जातीजातींचे समीकरण इतके घन होत चालले आहे की एका ताटात जेवणाऱ्या दोन जातीतील मित्रांचा सुद्धा एकमेकांवर आता विश्वास उरला नाही. या सगळ्यांमध्ये मूळ आरक्षणाची मागणी बाजूला राहून आता जाती-जातीत संघर्ष पेटण्याची वेळ आली आहे. प्रत्येकालाच आपली स्वतःची जात प्रिय असते मात्र त्याचबरोबर दुसऱ्याच्या जातीचाही आदर – सन्मान करून एकमेकांमधील विश्वास टिकवता आला पाहिजे.

सर्व जातींचा सन्मान आणि आपल्या अवतीभवती सन्मानाची जागा मिळवून देत या विश्वासाला आणि आपसातील बंधू भावाला धनंजय मुंडे या नेतृत्वाने कायमच प्राधान्य दिलेलं आहे.

मागे लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेकांची जात काढण्यात आली आणि कोणत्या जातीला जिल्ह्यात किती महत्त्व आहे यावरूनही रणकंदन झाले.

धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव यांच्यापासून ते सुरक्षा रक्षक, केअर टेकर, वाहन चालक ते अगदी जेवण बनवणारे आमचे सय्यद मामा यांच्यापर्यंत सर्व जाती-धर्मातील सदस्य सावली सारखे सोबत असतात.

धनंजय मुंडे यांच्या पदाधिकारी व कारभारी मंडळींमध्ये त्याचबरोबर त्यांच्या जवळच्या मित्रपरिवारात देखील सर्व जाती-धर्मातील प्रतिनिधी आढळून येतात. इतकेच नाही तर धनंजय मुंडे ज्या व्यक्तीला नगराध्यक्ष करण्यासाठी स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून वेगळे झाले ते सुद्धा कुणी वंजारी नव्हते. अशी असंख्य नावे व उदाहरणे आहेत. धनंजय मुंडे यांच्या सोबतीने सावलीसारखे ही सर्व मंडळी खांद्याला खांदा लावून प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक लढाईत सोबत असतात. धनंजय मुंडे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आली तेव्हा आणि पक्ष आपल्या या सर्व शिलेदारांना बरोबरीने सत्तेचा वाटा देऊन सोशल इंजिनिअरिंग साधलेली आहे. म्हणूनच परळी मतदारसंघ एकीने आपल्या नेक लेकाला कायम साथ देत आला आहे.

आपलं घर, घरातल्या किचनपासून जाती मुक्त ठेवणारा व सर्वधर्मसमभाव जपणारा हा माणूस जातीयवादी कसा असू शकतो?

ज्या माणसाने कधी निधी वाटपात, कुठल्याही शासकीय संस्थेत पद देताना किंवा पक्षाचे पद देताना जात नाही तर काम पाहिले, याची साक्ष कितीतरी जण उघडपणे देतील! त्या कोविडच्या काळात आठवा कुणाची जात पाहिली मदत करताना?

सर्वांना बरोबरीने समान संधी निर्माण करून देणारे असे लोकनेतृत्व नशिबाने व दीर्घ काळाने लाभते. खरंतर अशा नेतृत्वाची उंची आपण आपले पाठबळ सर्वशक्तीने पाठीशी उभे करून दाखवायची हीच ती वेळ असावी. समस्त परळी मतदारसंघ आणि बीड जिल्हा आगामी काळात ते दाखवून देईल असा विश्वास वाटतो.

लोकनेतृत्वाकडे आशा अपेक्षा सर्वांच्या असतात. त्या वेळोवेळी पूर्णही होत असतात. खरी गरज असते माणसातला ‘जगमित्र’ ओळखून त्यांच्या सोबतीला आपण आपला विश्वास आणि आपली निष्ठा कायम अबाधित ठेवण्याची. आगामी काळात सर्वजण मिळून ते सिद्ध करतीलच! शेवटी कसंय ना, नेते अनेक असतात, निवडणूका अनेक असतात, पण सर्वांना सोबत घेऊन चालणारा, अठरा पगड जातींच्या गराड्यात सर्वांना प्रगतीसाठी झटणारा ‘जगमित्र’ कोत्यावधी लोकांमध्ये एकच असतो!

उच्च विचारसरणी, मनात कायम आपल्या मातीशी व मातीतील माणसाशी इमान आणि कितीही मोठ्या पदावर असले तरी पाय जमिनीवर… अशा मोठ्या मनाच्या राजा माणसाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

सुधीर सांगळे