मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नारीशक्ती ॲप मध्ये तांत्रिक अडचणीमुळे फॉर्म भरण्यास येत आहेत अडचणी; ॲपच्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात!
माननीय जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार यांनी लक्ष घालण्याची गरज!
बीड /परळी वैजनाथ प्रतिनिधी-एम एन सी न्यूज नेटवर्क – मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. महायुतीच्या सरकारची महत्वकांक्षी असलेली ही योजना नारीशक्ती ॲप मध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे महिलांना ऑनलाइन फॉर्म भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच परळी तहसील कार्यालयाचे तहसीलदार साहेबांनी मार्ग काढावा आणि महिलांची होणारी धावपळ थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केली आहे.
नारीशक्ती ॲपद्वारे हा फॉर्म न भरताना त्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र सांकेतिक स्थळ(वेबसाईट)ची सुविधा महिलांना उपलब्ध करून द्यावी. सध्या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राबाहेर महिलांची असंख्य गर्दी होत आहे परंतु दिवसभर थांबून सुद्धा फॉर्म भरल्या जात नाही. सेतू केंद्र चालकांना विचारणा केली असता नारीशक्ती ॲप मध्ये डॉक्युमेंट अपलोड होण्यास वेळ लागत आहे कधीकधी फॉर्म ॲप मधून बाहेर फेकला जातो असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारची महत्वकांक्षी असलेली योजना ही लाडक्या बहिणी पर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची शासनाने निर्मिती करावी आणि लाडक्या बहिणींची होणारी धावपळ आणि पायपीट थांबवावी त्यासाठी जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेबांनी लक्ष देऊन या ॲप अंतर्गत येणाऱ्या अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.