राजाभाऊ फड यांची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे 

परळी मतदार संघाचा बारामतीच्या धर्तीवर विकासाचा ध्यास 

बीड /परळी वैजनाथ – परळी विधानसभा मतदार संघाचा केवळ कागदावर होत असलेला विकास प्रत्यक्षात उतरुन बारामतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास साधण्यासाठी परळी मतदार संघाचे युवा नेतृत्व राजेभाऊ फड देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या कंपुमध्ये दाखल झाले असुन लवकरच त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहिर प्रवेश होणार असल्याने परळी विधानसभा मतदार संघातील राजकिय समिकरणे झपाट्याने बदलणार आहेत.

परळी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती पैकी एक असलेली कन्हेरवाडी ग्रामपंचायत वीस वर्षांपासुन ताब्यात असलेले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक,सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणुन राजेभाऊ फड यांचे कार्य परळी मतदार संघाला परिचित आहे. स्वच्छ प्रतिमा व युवा उद्योजक म्हणुन युवक वर्गात वेगळी क्रेझ असलेल्या राजेभाऊ फड यांनी रासपाच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदावरुन महाराष्ट्रात छाप सोडली आहे. कार्यकर्त्यांकडुन परळी विधानसभा लढवण्याचा होत असलेला आग्रह व परळी विधानसभा मतदार संघात आत्तापर्यंत केवळ कागदावरच विकास होत प्रत्यक्षात विकासापासुन कोसो दुर असलेल्या जनतेला परळीचे विकसित रुप दाखवण्याचे ध्येय घेवुन आपण परळी विधानसभा मतदार संघातुन निवडणुक लढवणार असल्याचे जाहिर केल्यानंतर राजेभाऊ फड यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी गाठी भेटी वाढल्या.

परळी विधानसभा मतदार संघात देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग असुन याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीत आलेला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल आदी नेत्यांच्या भेटीनंतर परळी मतदार संघाचे हे युवानेतृत्व शरदचंद्र पवार यांच्या कंपुमध्ये दाखल होत असल्याने परळी विधानसभा मतदार संघाची निवडणुक रंगतदार होणार आहे. युवा नेते राजेभाऊ फड यांचा लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहिर प्रवेश होणार असल्याने परळी विधानसभा मतदार संघातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.