🔺पंकजाताई मुंडे यांचे राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन
🔺२९ जुलैला बीड जिल्ह्यात येणार ; भगवान भक्तीगड ते परळी महापुरुषांना करणार वंदन
परळी वैजनाथ – दि२५- २६ जुलै रोजी आपला वाढदिवस असून संपूर्ण राज्यातून वाढदिवसाच्या दिवशी ताई तुम्ही कुठे भेटणार? अशा प्रकारचे संदेश मिळत आहेत, तथापि, हारतुरे , सत्कार, बडेजाव असा कोणताही उत्सवी स्वरूपात वाढदिवस साजरा करणे हे सद्य परिस्थितीत समर्पक वाटत नाही, त्यामुळे केवळ आपल्या प्रेमरुपी एका एसएमएस वर वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद प्रदान मला द्यावेत असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना केलं आहे. दरम्यान, विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी येत्या २९ तारखेला भगवानभक्ती गडापासून परळीपर्यंत आपण महापुरुषांना वंदन करत दौरा करणार असल्याचे सांगितले आहे. वाढदिवसा दिवशी सर्वांनी आहे त्या ठिकाणावरून केवळ एसएमएसवरुन शुभेच्छा द्याव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.
पंकजाताई मुंडे यांनी वाढदिवसाच्या अनुषंगाने आपल्या समर्थकांना आवाहन करणारा एक व्हिडिओ प्रसारित केला असून या व्हिडिओमध्ये त्यांनी सर्वांना विनंतीवजा आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, माझा वाढदिवस उत्सवी स्वरूपात साजरा करावा हे मला कधीच पटलेले नाही, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आपल्या काही बांधवांनी आत्महत्या केल्याच्या घटना या अतिशय वेदनादायी आहेत. या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस उत्सवी स्वरूपात साजरा करणे माझ्या मनाला न पटणारे आहे. त्यामुळे मी वाढदिवसाचे निमित्ताने हार तुरे सत्कार असे काहीही स्वीकारणार नाही. कार्यकर्त्यांनी कुठलाही बडेजाव करू नये तसेच वाढदिवशी भेटायला येण्याचे टाळावे. वाढदिवसाचे उत्सवी स्वरूप टाळून माझा मान राखावा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
२९ जुलैला बीड जिल्ह्यात ; महापुरुषांना करणार वंदन
दरम्यान, विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पंकजाताई मुंडे येत्या सोमवारी २९ जुलै रोजी बीड जिल्ह्यात येत आहेत. स्वतःचा सत्कार न घेता जिल्हयातील विविध ठिकाणी महापुरुषांना त्या वंदन करणार आहेत. राष्ट्रसंत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगडावर पुष्पवृष्टी व संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन हा दौरा सुरू करणार आहोत. भगवान भक्ती गडानंतर श्रीक्षेत्र नारायणगड त्यानंतर बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करणार आहेत. त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन, परळी येथे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या दौऱ्यात आपण कोणतीही हार तुरे स्वीकारणार नसून केवळ पुष्पहार हे महापुरुषांना अर्पण करणार आहोत. त्यामुळे या दौऱ्यातही माझ्यासाठी कोणीही हार तुरे आणू नयेत असे आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
••••