विशेष लेख- लोकमान्य लोकनेत्या
——–
प्रदीप कुलकर्णी
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘मुंडे’ नावाचा जो आज दबदबा आहे तो केवळ लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यामुळे..आणि त्यांच्यानंतर हा दबदबा असाच पुढे टिकून राहिलाय तो ‘ताईसाहेब’ अर्थात पंकजाताई यांच्यामुळेच..हे त्रिवार सत्य आहे. पंकजाताईंची राजकीय ताकद, आक्रमक शैली, सर्वांना सोबत घेऊन जाणारं त्यांचं नेतृत्व, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा असणारा मोठा पाठिंबा आणि वंचित, पिडित घटकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ याची प्रचिती महाराष्ट्राला वारंवार आलेली आहे येत आहे. स्वाभिमानी आणि कणखर बाणा यामुळे राजकारणात त्यांची एक वेगळी छाप आहे. निवडणूक म्हटलं की जय-पराजय असतो पण बीडच्या निवडणुकीत त्यांचा झालेला निसटता पराभव सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या मनाला इतका जिव्हारी लागला की, आत्महत्येसारख्या घटना घडल्या. हे असं एखाद्या राजकीय नेत्याच्या बाबतीत क्वचितच घडलं असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात असं यापूर्वी कधी झाला नसावं. आपल्या लाडक्या नेत्याच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाचं बरं-वाईट करणं ही तशी वेदनादायक आणि मनाला चटका लावणारी गोष्ट..पण यातून एखाद्या नेत्यांवर सामान्य माणूस किती जीवापाड प्रेम करतो हे ही दिसून येतं, पंकजाताईंच्या बाबतीत देखील असंच झालं. केवढ हे प्रेम..! पंकजाताईंच्या मागे असणारी जनशक्ती किती प्रचंड आहे, हे सत्ता अथवा कोणतही संवैधानिक पद नसताना शिवशक्ती परिक्रमा असो की दसरा मेळावा यात वेळोवेळी दिसून आलेलं आहे. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर पंकजाताईंना दुर्लक्षित करून चालणार नाही हे लक्षात आल्यानं भारतीय जनता पक्षानं त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली आणि त्या आमदार म्हणून विजयी झाल्या. या विजयाने राज्यातील लाखो, करोडो कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले. “कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली” या गर्जनेने महाराष्ट्राचं विधानभवन त्यादिवशी अक्षरशः दणाणून गेलं. लोकसभेतील पराभवानंतर पंकजाताई खचून गेल्या नाहीत, पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागल्या. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ या ध्येयाने महाराष्ट्राची ही वाघीण पुन्हा मैदानात उतरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पंकजाताई मुंडे यांची राजकीय कारकीर्द सुरवातीपासून तशी संघर्षाचीच.. तरीही त्यावर स्वकर्तृत्वाने मात करत मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग त्यांनी लोकांच्या भल्यासाठीच केला. एक सरळमार्गी राजकारणी, जनतेच्या अडी- अडचणीला धावून जात त्यांच्या वेदना समजून घेण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं. महाराष्ट्रातील लाखो- करोडो कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी अन् प्रेमाची भावना आहे, हिच शक्ती त्यांना उर्जा देऊन जाते. पंकजाताई कधी कोणाचं वाईट चिंतणार नाहीत की करणार नाहीत, त्या त्रास सहन करणाऱ्या पैकी आहेत, देणाऱ्या पैकी मुळीच नाहीत, ही भावना, हा आदर आज त्यांच्याविषयी सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाची हुजरेगिरी करणे, झुकणे त्यांच्या रक्तात नाही तथापि राजकारणात वरिष्ठांचा आदर ठेवण्याचे संस्कार त्या कधी विसरल्या नाहीत.
राजकारणात काम करत असताना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये, याची काळजी त्या सतत घेत असतात. हीच काळजी त्यांच्यात सामान्य माणसांविषयी असलेली तळमळ दाखवून देते. सत्तेच्या काळात मंत्री म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय असंच होतं, आपल्या खात्याच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ तर त्यांनी गोरगरिबांपर्यंत पोहोचविलाच परंतु त्याचबरोबर अनेक नव नवीन योजना अंमलात आणून लोक कल्याणाची एक अनोखी संकल्पना रूजविली. मध्यप्रदेशात सह प्रभारी म्हणून काम करीत असताना तिथल्या भाजप सरकारने राबविलेली ‘लाडली बहना’ योजना त्यांच्या आग्रहामुळे महाराष्ट्र सरकारने इथेही अंमलात आणली, हे त्यांच्यात असलेल्या लोकनेत्याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.
सत्तेच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवल्याने त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली, ज्यामुळं अनेकांची पोटं दुखली, त्यांच्या विरोधात कट कारस्थानही रचली गेली पण, प्रत्येक ‘विजयात संघर्ष’ आणि प्रत्येक ‘संघर्षात विजय’ या लोकनेत्याच्या समीकरणाची शिकवण व संस्काराच्या शिदोरीवर त्यांनी इथेही विजय मिळवला. वंचित, शोषित, बहुजनांच्या हितासाठी मुंडे साहेबांचा वसा घेऊन सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास रोखण्याचा निष्फळ प्रयत्न अनेकांनी केला, परंतु संघर्षाची शिकवण व जनसामान्यांचे असीम पाठबळ लाभल्याने त्यांना रोखणं कुणालाही शक्य झालं नाही.
मोठया माणसांचा वारसा चालवणं हे तसं एक आव्हानच असतं, ते पेलणं सर्वानाच शक्य होत असं नाही पण पंकजाताई मात्र याला अपवाद आहेत. मुंडे साहेबांचा वारसा होणं म्हणजे त्यांच्या सत्ता, संपतीचा वारसा होणं नाही, तर त्यांच्या आदर्श विचारांचा..वंचित, पिडित, शोषित, दीनदुबळ्यांची सेवा करण्याचा.. आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा वारसा चालवणं..जे काम पंकजाताई आपल्या राजकीय जीवनात अव्याहतपणे करत आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासताना ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही ‘ हे त्यांनी केवळ बोलून नव्हे तर आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. पद, सत्ता असो वा नसो मुंडे साहेबांचा माणसं जोडण्याचा सक्षम वारसा त्यांनी कायम जपला. आपल्या कामांतून त्यांनी वंचित, उपेक्षित घटकांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. समाजातील जातीभेद झूगारून एक माणूस म्हणून विविध घटकांना आपुलकीने जोडण्याचे काम त्या करत आहेत. सामान्य माणसासाठी अहोरात्र काम करण्याच्या स्वभावामुळे आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत लोकनेत्याचा खरा वारसा त्या आज पुढे नेत आहेत. लोकांना त्यांच्या रूपात मुंडे साहेबच दिसतात, त्यांच्यावर येणारा प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी कार्यकर्ते सदैव तयार असतात. ‘गोपीनाथ मुंडे हे नांव जगाला विसरू देणार नाही’, अशी शपथ घेणारे त्यांचे स्वाभिमानी नेतृत्व संघर्षाच्या अग्निदिव्यातून बाहेर पडून पुन्हा तितक्याच रूबाबात आणि आत्मविश्वासाने वाटचाल करेल, यात तीळमात्र शंका नाही. परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, त्यांच्या हातून जनसामान्यांची सेवा सतत होत राहो..याच आजच्या वाढदिवशी मनःपूर्वक शुभेच्छा..!
••••