राष्ट्रसंत भगवानबाबांनी अनिष्ट रूढी प्रथांचे निर्मूलन केले- पो. नि. संजय लोहकरे

संतांनी समाजात मानवता रुजवली – ए. तु कराड
————————————
🔺 राष्ट्रसंत भगवानबाबांची जयंती पत्रकार भवनात संपन्न

परळी वैजनाथ/प्रतिनिधी- राष्ट्रसंत भगवानबाबांनी अनिष्ट रूढी प्रथांचे निर्मूलन केले असे प्रतिपादन परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी
राष्ट्रसंत भगवानबाबा महाराज यांची १२८ वी जयंती निमित्ताने लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे केले.परळी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चर्चासत्राचे उद्घाटकीय भाषणात ते बोलत होते . या वेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून लेखक ए. तू. कराड, पत्रकार धनंजय अरबुने, संपादक राजेश साबणे, संपादन आत्मलिंग शेटे, संपादक महादेव गित्ते उपस्थित होते.पुढे बोलताना संजय लोहकरे म्हणाले कि, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. यात संत नामदेव, संत नरहरी महाराज, संत तुकाराम महाराज ,संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, अशाच संतांच्या शृंखलेत बीड जिल्ह्यातील राष्ट्रसंत भगवानबाबा महाराज यांचेही सामाजिक शैक्षणिक कार्य महत्वाची भूमिका बजावली.

राष्ट्रसंत भगवान बाबांनी पशुहत्या, अनिष्ट रूढी प्रथांना आळा घातला. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते लेखक ए. तु कराड यांनी राष्ट्रसंत भगवानबाबा महाराज यांचे सामाजिक-शैक्षणिक विचार आणि आजचे वास्तव्य या विषयवार सखोल मार्गदर्शन केले. या परिसरात मोठ्या प्रमाणात अज्ञान, अंधश्रद्धा, सामाजिक द्वेष, विषमता व गुलामीत राहणाऱ्या लोकांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाने राहण्याची शिकवण कीर्तनातून दिली. समाजात मानवतावाद रुजवला. देशात महात्मा बसवेश्वर, छ. शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत भगवानबाबा महाराज यांची जयंती/ जन्मोत्सव दोन वेळेस होत असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

आज राष्ट्रसंत भगवानबाबांची जयंती आपण तारखे प्रमाणे साजरी करत असल्याचे ते म्हणाले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात दै. अतुल्य महाराष्ट्राचे संपादक नितीन ढाकणे म्हणाले कि,राष्ट्रसंत भगवान बाबांनी दऱ्या डोंगरात राहणाऱ्या समाजाला कीर्तनातून प्रबोधन केले. भगवानगडावर बहुजनांचे प्रेरणास्रोत विठ्ठल-रुकमाईच्या मूर्तीची स्थापना भगवानबाबांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी केले. सम्राट गित्ते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, संपादक बाळासाहेब फड, पोलीस विष्णू फड ,विकास वाघमारे, बाबा शेख, श्रीमंत खांडेकर, परमेश्वर मुंडे, अजय फड, हरिभाऊ आगलावे आदींची उपस्थिती होती.