पाणीपुरवठा-
परळी वैजनाथ-एमएनसी न्यूज नेटवर्क- सध्या परळीला पाणीपुरवठा करणारे मुख्य नागापूर धरण पूर्णपणे भरत आले आहे. त्यामुळे शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी एका निवेदनाद्वारे परळीचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांना केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहराला नागापूर येथील वाण धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या शहरातील नागरिकांना पाच दिवसाआड पाणी सोडले जाते. यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी पुरत नसल्याने सार्वजनिक व खाजगी बोअरचा वापर होत आहे. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी कमी होत आहे. तसेच सार्वजनिक बोअर चा वापर वाढल्यामुळे नगरपरिषदेवर लाईटबिलाचा अतिरिक्त बोजा वाढत आहे. यापूर्वी पाणीपुरवठ्या साठी दोनच टाक्या होत्या. आता विशेष पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात टाक्यांची भर पडली आहे. तरीही पाणी मात्र पाचदिवसाआड का असा सवाल अश्विन मोगरकर यांनी केला आहे. नागापूर धरणात पाणी कमी असताना आठवड्यातून एकदा पाणी सोडले जाते ही बाब लक्षात येऊ शकते. परंतु सध्या पावसाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात नागापूर धरण 100% भरत आले आहे. यापूर्वीही अनेक वेळा अश्विन मोगरकर यांनी नगरपरिषदेला सदर मागणीसाठी पाठपुरावा केला आहे.
धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता परळी शहरातील नागरिकांना दोन दिवसाआड पाणी देणे नगरपालिकेला शक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचे नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे. या मागणीची आपण दखल घेऊन लवकरच अशा प्रकारचे नियोजन करू असे मुख्याधिकारी कांबळे यांनी सांगितले.