निसर्गाच्या सानिध्यात..

🔺निसर्ग सौंदर्य🔺 भटकंती 🔺भ्रमंती 🔺जंगल सफर 🔺पर्यावरण पर्यटन

🔷 नमिता प्रशांत-अमरावती

आपण सगळेच निसर्गात रमतो…💚
पण निसर्गानेही आपली साथ आनंदाने अनुभवायला हवी असते.. कधी घेतलाय का हा अनुभव, की तुमच्या अस्तित्वाने तो आनंदित झालेला आहे…
कधी असं झालंय का…????
तुम्ही त्याच्या कवेत आहात आणि वारा हळुवार फक्त तुमच्या अवतीभवती गोलगोल गिरक्या घेऊन नाचतोय…
कधी अचानक ढगांतून पाण्याचे तुषार शिंपडल्या जात आहेत…
फुलपाखरं इर्दगीर्द बिनदिक्कत बागडत आहेत…

तुम्ही निवांत बसले आहात आणि पक्षी गोड गाणी ऐकवत आहेत…
मेघ अनेक रंगांच्या छटा दाखवत स्वगत गात आहेत…
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी अंगाला टोचत नाहीये…
नदीत पाय टाकून बसल्यावर प्रत्येक लहर पायाचे चुंबन घेते आहे…
झाडांची पाने तुम्हांला स्पर्शून सळसळ करताहेत…
चालता चालता वेली तुमचे हात पाय धरून तुम्हांला थांबवत आहेत…

तुम्ही उभे आहात आणि अलगद तुमच्या अंगावर फुलांचा वर्षाव होतोय, बघता बघता सुगंध तुमच्या रोमांरोमांत भिनतोय…
तुमच्या स्पर्शाने असंख्य कळ्यांची फुले होऊ पहात आहेत…
आकाशातील चांदण्या बघत तुम्ही सहज पहुडलेले आहात आणि बोट दाखवाल ती चांदणी निखळतेय…
चंद्र उगाच लपाछपी खेळतोय…आहे ना गंमत…
तू म्हणते म्हणून पावसानं बरसावं अन अंग पोळतंय म्हणून जरासं सूर्यानं लपावं…कित्ती छान अनुभव आहेत हे…
आपण अनवानी फिरावं पण आपल्या मर्जीशिवाय मायमातीनं आपल्या अंगावर, पायाच्या तळव्यांवर, कपड्यांवर आपली ओळखहीं सोडू नये.. इतकं तिनं आपल्याला जपावं…स्वच्छ ठेवावं…हे प्रेम आहे निसर्गाचं… 🌿💚

आपण जे जे देतो, तेच आपल्याला परत मिळतं..
प्रेमाच्या बदल्यात प्रेम, तिरस्काराच्या बदल्यात तिरस्कार…
हाच निसर्गाचा नियम आहे… 🌿
निदान आपल्या मुलांना निसर्गांवर प्रेम करायला शिकवा… त्यांना हे अद्भुत जग अनुभवू द्या…बघा ते सांगतील, मी खोटं आणि स्वप्नाळू बोलत नाहीये. 😊

– नमिताप्रशांत 🌿