🔶 आचार्य ज्ञानप्रकाशजी व पं. भूपेंद्रसिंह आर्य यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार !
बीड/परळी-वैजनाथ – श्रावण महिन्यात शास्त्रश्रवणाचे औचित्य साधून विशुद्ध वैदिक ज्ञानाच्या माध्यमाने मानवी जीवनाला धार्मिक , आध्यात्मिक, बौद्धिक व सामाजिक कल्याणाची सुयोग्य दिशा प्राप्त व्हावी, या उद्देशाने येथील आर्य समाजाच्या वतीने येत्या मंगळवार (दि.१३) पासून श्रावणी वेद प्रचार सप्ताहाला सुरुवात होत आहे. यासाठी मार्गदर्शक व्याख्याते म्हणून बलिया (उ. प्र.) येथील वैदिक शास्त्रांचे प्रकांड विद्वान आचार्य श्री ज्ञानप्रकाश शास्त्री तर भजनगायक म्हणून अलिगढ (उ.प्र.) येथून प्रसिद्ध अभ्यासक पं. भूपेंद्रसिंह आर्य यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेतर्फे परळी आर्य समाजासाठी हा कार्यक्रम देण्यात आला आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियोजन बैठक संपन्न झाली. त्यात सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार वेद प्रचार सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ७.३० वा. वेद पारायण यज्ञ, ८.३० वा. भजनसंगीत, ९.३० वा. धार्मिक व आध्यात्मिक विषयावर प्रवचने पार पडतील. त्यानंतर ११.०० वा. विविध शाळां- महाविद्यालयांत व्याख्याने, दुपारी ३ ते ४ वा. जिज्ञासू नागरिकांच्या अध्यात्मविषयक शंकांचे समाधान असे विविध कार्यक्रम संपन्न होतील. तर रात्री ८.०० वा. भजन संगीत व ९.०० वाजता पारिवारिक, सामाजिक, राष्ट्रीय व अन्य प्रासंगिक विषयावर मौलिक व्याख्याने पार पडतील.
तरी या कार्यक्रमांचा शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आर्य समाजाचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया, मंत्री उग्रसेन राठौर , कोषाध्यक्ष श्री देविदासराव कावरे , उपप्रधान लक्ष्मण आर्य गुरुजी, डॉ मधुसूदन काळे, उपमंत्री पं. प्रशांतकुमार शास्त्री, जयपाल लाहोटी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.