सारस्वतांची पायधूळ लागलेले ‘दिलासा’ आता ‘चार भिंतीं’चे घर “वास्तु-पुरुष” प्रा. मधु जामकर सर आता पुणेकर !

🔷 साभार : Bipin Deshpande/बिपीन देशपांडे

प्रख्यात साहित्यिक नरहर कुरुंदकरांसाठी ते हक्काचे घर. तर कुसुमाग्रजांपासून ते मंगेश पाडगावकर, दाजी पणशीकर, अशा अनेक मान्यवर साहित्यिकांना “विसाव्या”चे काही क्षण मिळवण्यासाठी आपलीशी आणि “दिलासा”दायक वाटणारी ती वास्तु. ‘दिलासा’ तिचेच नाव. परळीतील स्नेहनगरची खास आेळख ठेवून असलेल्या या वास्तूत अर्ध शतकापेक्षा अधिक काळ वास्तव्य करून, १७ पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन करून ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक, कविवर्य, गुरुवर्य प्रा. मधु जामकर यांनी अलिकडेच पुण्याकडे प्रस्थान केले आहे. जामकर सर आता पुणेकर झाले आहेत. सारस्वतांची राजधानी मानली गेलेल्या शहरात ते आता स्थिरावत आहेत.

प्रख्यात सारस्वतांसाठी हक्काने उतरण्याचे ठिकाण म्हणून एकेकाळी आेळख जपलेली ‘दिलासा’ वास्तु मात्र आता नव्या पिढीसाठी ‘चार भिंतींच्या’ घराशिवाय फार काही नसेल.
कविता, ललित, समीक्षेच्या प्रांतात विपुल लेखन केलेल्या प्रा. जामकर सरांना उत्कृष्ट वाङमयासाठी महाराष्ट्र शासनाचा, ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकरांच्या नावचा, पुणे मसापचा, यशवंतराव चव्हाण जीवन गाैरव, अशा अनेक पुरस्कारांनी गाैरवलेले आहे. परळीमध्ये १९९६ साली आयाेजित केलेल्या ७१ व्या साहित्य संमेलनाचे ते कार्यवाहही हाेते. चेंबूरमध्ये आयोजित समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे. परळीत विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम, कै. जीवनराव देशपांडेंसह अन्य व्याख्यानमालेसाठी येणाऱ्या निमंत्रित साहित्यिकांचे उतरण्याचे ठिकाण प्रा. जामकर यांचे “दिलासा”च हाेते. ही वास्तु विक्री होऊन पुण्यात घरसामान हलवण्यापर्यंत तेथील दर्शनी भागातले नरहर कुरुंदकरांचे छायाचित्र लक्ष वेधायचे. प्रत्यक्षात स्वतः कुरुंदकर यांचे दिलासा म्हणजे हक्काने येऊन उतरण्याचे ठिकाण हाेते. अनेक प्रख्यात साहित्यिकांनी खास मराठवाडी भुरका असलेल्या जेवणाचा आस्वादही याच वास्तुत घेतलेला आहे. व्याख्यानासाठी येणारे दाजी पणशीकरही दिलासामध्येच थांबत. माजी संमेलनाध्यक्ष द. मा. मिराजदार, वि. वा. शिरवाडकर, मंगेश पाडगावकर, राजा मंगळवेढेकर, आदी अनेक नामवंत येथे पायधूळ झाडून गेलेले असल्याचे सांगताना प्रा. जामकर यांचा स्वर काहीसा कातर हाेताे. आता ते दिलासातून पुण्यात स्थायिक झाले आहेत. नव्या पिढीला मात्र, दिलासातून परळीकरांना झालेला साहित्य सहवास माहित नसणार. आता आठवणींच्या या पाऊलखुणाच !