शहरातील चित्रपटगृहांचा व्यवसाय डबघाईला

◾ तांत्रिक दृष्ट्या सिनेमा निर्मितीत प्रगती झाली ,पण प्रेक्षक थेटर पासून दुरावला.

◾अनेक ओ टी टी प्लॅटफॉर्म, ॲप मोबाईलवर सहज उपलब्ध

बीड/परळीवैजनाथ/ धनंजय आरबुने – तालुकास्तरीय गावात पूर्वीपासून मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन म्हणून चित्रपटगृहांकडे पाहिल्या जाते. सिंगल प्रोजेक्टरपासून ते डॉल्बी डीजीटल पर्यंत पोहोचलेले एक पडदा  चित्रपटगृह आज अखेरची घटिका मोजत आहेत. गत काही वर्षात शहरातील 4  सिंगल स्क्रीन (एक पडदा) चित्रपटगृह बंद पडले आहेत. अनेक आव्हानांना तोंड देत श्री-नाथ सारखे दोन पडदे असणारे चित्रपटगृह कसेबसे तग धरून सुरू आहे.

दोन दशकापूर्वी चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या जास्त होती. आगाऊ तिकीट विक्रीमुळे चित्रपट रीलीज होण्यापूर्वीच चित्रपटगृहाबाहेर हाऊसफूलचे फलक लागायचे. दोन-तीन आठवड्यापर्यंत चित्रपटगृहाचे मुख्य दोन शो तरी हाउसफुल होत असायचे मात्र दिवस बदलले. प्रेक्षकांची संख्या घटत गेल्यामुळे  अनेक चित्रपटगृह बंद झाले. गत काही वर्षांत शहरातील प्रभात, लक्ष्मी टॉकीज, गोपाल टॉकीज, कृष्णा टॉकीज, बंद पडल्या आहेत.

श्री नाथ चित्रपट गृह धडपडत सुरू असून, त्यास ही प्रेक्षक मिळत नाहीत. बदलत्या तंत्रज्ञान आणि डीजीटल झालेल्या परिस्थितीत एक पडदा चित्रपटगृहांनी स्वतःला अपडेट न केल्याने त्यांची जागा मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांनी घेतली.आज मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात एकाच वेळी चार- पाच स्क्रीनवर वेगवेगळे चित्रपट दाखवले जातात.

■ १९३०  च्या दशकापासून  स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु झालेलं व्हिक्टरी – (प्रभात टॉकीज) हे परळी शहरात पहिले चित्रपट गृह .
पंचक्रोशीतील पहिल्या चित्रपट गृह असण्याचा मान या टॉकीज ला जातो.

१९३५-३६ कालावधीत  लक्ष्मी टॉकीज हे ताज खान यांचे चित्रपटगृह सुरू झाले अमेरिकेतील प्रोजेक्टर आणि ध्वनी यंत्रणेने ते सुसज्ज होते.तर २६ जानेवारी १९७८ ला गोपाल कृष्ण चित्र मंदिराचा शुभारंभ अमर अकबर अँथनी या चित्रपटाने झाला. शहरातील मँटनी शो ही येथूनच सुरू झाला.

संस्कृतिक चळवळीत आणि साहित्यिकांत रमणारे, सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे एन.के देशमुख आणि त्यांच्या बंधूंनी १९८४-८५ च्या दरम्यान शहरात दोन स्क्रिन असलेले डॉल्बी डिजिटल,आणि सिनेमास्कोप सुविधा असलेल्या  जिल्ह्यातील पहिल्या चित्रपट गृहाची सुरुवात झाली .

१९८८-८९ दरम्यान  सर्व आधुनिक सुविधासह  शहरात बाजीराव देशमुख यांचं कृष्णा चित्रमंदिर तेही प्रगत ध्वनी यंत्रणाने सुसज्ज असं सुरू झालं. शहरातील रसिकांना आनंद व मनोरंजन देणारा सुवर्णकाळ सुरू झाला.दरम्यान त्यानंतर नाथ चित्रपट गृहाला जोडूनच श्री चित्रमंदिर सुरू करण्यात आले.

🔷 चोका चौकात, दुकानाच्या समोर लावले जाणारे सिनेमा पोस्टर याच काळात होते.  बदलत्या काळात चित्रपटाची पेटी प्रिंट (रीळ) बंदच झाली. आधुनिक  सॅटेलाईट UFO तंत्रज्ञानाचा उगम, वाढत्या इंटरनेट सुविधेचा परिणाम म्हणा शहरातील  चार सिनेमा गृह बंद झाली. एकुणच सहा चित्रपट गृह असणाऱ्या  शहरात आज एकमेव  श्री-नाथ चित्रमंदिर सुरू आहे.

◾चित्रपट गृहावर अवलंबून असणाऱ्या बऱ्याच कुटूंबाची परवड होत आहे, ऑपरेटर, डोअरकीपर, चहा दुकान पान शॉप ही कामे करणाऱ्या मंडळीं आता ईतर कामात स्वतः ला गुंतवत आहेत.
…………………………………………………………

◾आम्ही अत्यंत अडचणींना तोंड देत सिनेरसिकांसाठी चित्रपटगृह चालवीत आहोत. परंतु नजीकच्या मोठ्या शहरातील मॉल संस्कृती, अत्याधुनिक साखळी सिनेमा गृहा मुळे किंवा  छोट्याशहरातील मर्यादित सुविधा असलेल्या  सिनेमा ग्रहांना प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. वाढते टीव्ही चॅनल, इंटरनेट , यूट्यूब, विविध वेबसिरीज आदींमुळे हातांत च मिळणारे अनेक मोफत व्हिडीओ,  चित्रपटगृहात प्रेक्षक न येण्याचं मुख्य कारण म्हणता येईल.

उत्तमराव देशमुख, चित्रपट गृह मालक
…………………………………………………