परळी बीड मार्ग बंद; पांगरी गावाजवळील पर्यायी भराव टाकून केलेला पूल गेला वाहून

पाऊस 🔷 परळी -बीड मार्ग बंद

परळी वैजनाथ– परळी-सिरसाळा- बीड कमी अंतराचा तेलगाव मार्गे बीड या रस्त्यावर पुलाची कामे सुरू आहेत नदीपात्रात भराव टाकून केलेला तात्पुरता पूल काल झालेल्या मुसळधार पावसाने वाहून गेला आहे. त्यामुळे परळी मार्गे बीड जाणाऱ्या वाहनांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील पुलांची कामे पूर्ण होणे आवश्यक असतानाही ही कामे रेंगाळत राहिली. मात्र आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास परळी-बीड रस्त्यावरील पांगरी जवळील नदीपात्रात भराव टाकून केलेला पर्यायी पूल पाण्याने वाहून गेला. त्यामुळे परळी- बीड मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.

परळी बीड राज्य रस्त्यावर सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. परळी तालुक्यातील पांगरी जवळील वाण नदीवर असलेला मुख्य पूल काढून टाकण्यात आला असुन या ठिकाणी नवीन पूल निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने या ठिकाणी माती व मुरुमाचा भराव टाकून नदीपात्रातच एक पर्यायी पूल तयार करून मार्ग तयार करण्यात आला होता. वाण नदीवर नागापूर येथे वाण धरण आहे. हे धरण 100% भरल्याने पाऊस झाल्यानंतर संपूर्ण पाणी हे नदीपात्रात येत आहे. काल (शुक्रवारी) मध्यरात्रीनंतर परळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वाण नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. या पाण्याने पांगरी जवळील हा पर्यायी पूल वाहून गेला आहे. दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने परळी ते बीड हा रस्ता आता बंद झाला आहे.

नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याशिवाय तात्पुरत्या पुलाचे काम करता येणार नाही त्यामुळे आता पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहिल्याशिवाय पर्याय नाही तोपर्यंत मात्र परळी बीड हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहू शकतो, पर्यायी पूल तयार झाल्यानंतरच हा रस्ता सिरसाळा- बीडकडे जाण्यासाठी तयार होणार आहे. तोपर्यंत मात्र वाहनधारकांना दुसऱ्या अंबाजोगाई मार्गाचा वापर करावा लागेल आणि ते अंतरही अधिक असून अधिकच्या डिझेल पेट्रोलचा खर्च वाढणार आहे.