“काळकोट” परिसर…वस्तुसंग्रहालय, सिंदखेडराजा, जि. बुलढाणा

🔷 पर्यटन 🔺भ्रमंती 🔺निसर्ग यात्रा 🔺ऐतिहासिक आणि पौराणिक वस्तू संग्रहालय🔺”काळकोट” परिसर…वस्तुसंग्रहालय.

के नमिता प्रशांत प्रशांत किरणपुरे ही कलेमध्ये रमणारी  कलावंत जोडी. ड्रॉइंग, पेंटिंग, डिझाईनिंग, वॉल म्युरल्स असे थक्क करणाऱ्या सर्वच प्रकारात हातखंडा असणारी ही जोडगळी.

कल्पक कामाबरोबरच सातत्याने निसर्ग आणि ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी भटकत असतात. महाराष्ट्र न्यूज कनेक्ट च्या पर्यटन भ्रमंती भटकंती या सदरात मागील अनेक भागात आपण या जोडगळीने भेट दिलेल्या जागांचा प्रत्यक्ष आपणच भेट दिल्यासारखा लेखनानुभव पाहिला आहे.- संपादक

🔶 सिंदखेडराजा, जि. बुलढाणा –  फार उत्सुकतेने आपण एखादं ठिकाण गाठतो आणि बरेचदा प्रत्यक्ष त्या जागी गेल्यावर तुमच्या उत्सुकतेची अक्षरशः वाट लागते. हे वस्तूसंग्रहालय देखील असंच. दोन मजली प्रशस्त इमारत.. आत गेल्यावर एक हॉल, त्यांत शिर्षक देऊन बसविलेल्या पन्नासेक मुर्त्या.. विशेष काही माहिती नाही. माहिती देणारी, इतिहास समजावून सांगणारी खास नेमलेली व्यक्ती नाही.
माझ्या प्रत्येक प्रश्नाचं तिथे उपस्थित व्यक्तीने एकच उत्तर दिलं…’अभी काम चालू हैं.. ‘🙏

(कारण त्याच्याकडे एकच काम होतं, सकाळी नऊ वाजता उघडणे आणि सायंकाळी पाच वाजता बंद करणे.)

असो, आत्ताआत्ताच सिंदखेडराजा येथे, राजे लखूजीराजे जाधव यांच्या समाधीसमोर शेषशायी विष्णुची अतिशय सुबक अशी मूर्ती सापडली. खूप गवगवा झाला. कारण मूर्ती कुठेही खंडित नसून अतिशय सुस्थितीत आणि सुंदर आहे. त्या मूर्तीची योग्य ती दखल घेतल्या जाणारेय आणि घ्यायलाही हवी. कारण तो आपला प्राचीन इतिहास, ठेवा, संस्कृती आहे. ती जतन व्हायलाच हवी. मग आता ह्या ज्या खंडित मुर्त्या आहेत, ज्या या परिसरात अशा एका कोपऱ्यात रचवून ठेवलेल्या आहेत. त्यांना इतिहास नाहीये का ??? की त्यांच्यासारखाच त्यांचा इतिहासही खंडित झालेला आहे. ऊन वारा पाऊस या नैसर्गिक संक्रमणंपासून त्यांचें रक्षण होणे गरजेचे नाहीये का ??

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आम्ही कानांकोपऱ्यात घुसणारे, प्रश्न विचारणारे, वाद घालणारे माणसं आहोत त्यामुळे आम्ही येथवर पोहोचतो. मात्र आमच्यासमोर जेही उत्सुक मंडळी संग्रहालय पाहण्यासाठी आलीत ते फक्त तो एक हॉल बघून परतलीत. त्यांनी या कोपऱ्यात ढुंकूनही बघितले नाही. म्हणजे उपेक्षितच म्हणावं लागेल. आणि हीदेखील गॅरंटी की, ती मंडळी पुन्हा कधीच इकडे फिरकणारही नाहीत.

सिंदखेडराजा येथील वस्तूसंग्रहालय म्हणजे, मला वाटलं होतं…तेव्हाची परंपरा दर्शविणारी जुनी भांडी, दमण्या, पालख्या, जिजाऊ आऊसाहेबांच्या आठवणी, त्यांची खेळणी, कपडे, व्यवहारातील वस्तू, शस्त्रात्र साठा असं बरंच काहीबाही बघायला मिळेल. पण सगळंच आलबेल होतं. एखाद्या ऐतिहासिक, प्रसिद्ध अशा ठिकाणचं वस्तूसंग्रहालय कसं असावं????

असो, या संग्रहालयातील मुर्त्या अथवा येथील पुतळा बारव असो, हे बघून किती समृद्ध इतिहास असावा इथला,याची साक्ष नक्कीच पटते. जे दिसेल तेवढ्यावर समाधान मानून आपण आपलं स्वप्नंरंजन करून घ्यायचं अजून काय…सध्याची एकंदरीत परिस्थिती बघता आपला समृद्ध इतिहास पुस्तकांतच गुदमरणार आहे हे नक्की आहे. असो, चिंतन करूया…जतन करूया…जिथे बोलण्यासारखं आहे तेथे थेट बोलूयात..यावर अजून काही बोलण्यासारखं नाहीच..

– नमिताप्रशांत 🌿