धनंजय मुंडे पूरग्रस्त परळीकरांच्या भेटीला

🔶 आपत्तीग्रस्तांना दिलासा

🔺पुरग्रस्तांची भेट घेत नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश; प्रशासनास तातडीने मदतीचे निर्देश

🔺घरात पाणी शिरलेल्या नागरिकांच्या भोजनाची नाथ प्रतिष्ठान करणार व्यवस्था

परळी वैद्यनाथ  – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी शहरात सोमवारी झालेल्या पावसाने पुराचे पाणी शिरलेल्या विविध भागांमध्ये भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांना भेटी देत चर्चा करून धनंजय मुंडे यांनी नागरिकांना दिलासा दिला. यावेळी पुरामुळे घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले.

शहरातील सरस्वती नदीस मंगळवारी सकाळी पूर येऊन नदीकाठच्या अनेक वस्त्यांमधील घरामध्ये पाणी शिरले होते. अंबेवेस भागासह अनेक गल्लीत पाणी शिरले होते. राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दुपारी शहरातील पूरग्रस्त भागात भेट देऊन तेथील नुकसानग्रस्त नागरिकांची कैफियत ऐकून घेतली व नगरपालिका प्रशासनास स्वच्छता करून व तेथील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या.

घरात पाणी शिरून धन-धान्याचे नुकसान झालेल्या नागरिकांना तहसील मार्फत तात्काळ आपत्ती प्रतिसाद निधी देण्याची कार्यवाही करणे त्याचबरोबर नाथ प्रतिष्ठान च्या वतीने घरात-संसारात पाणी शिरलेल्या नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचनाही धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत परळीचे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, नगरपालिकेचे उपमुख्यअधिकारी संतोष रोडे, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, श्रीकृष्ण कराड, अनंत इंगळे , राहुल ताटे,तखी खान आदी उपस्थित होते. शहरातील नरहरी मंदिर , गंगासागर , खुदबेनगर ,इंदिरानगर ,रहिमत नगर ,मिलिंद नगर भिमानगर, बरकत नगर ,शाही फंक्शन हॉल, आंबेवेस परिसरास भेट देवून तेथील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त भागात प्रशासनाचे पथक सर्वे करीत आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली.