किसान सभेकडून विविध मागण्याबाबत बेमुदत धरणे आंदोलन

● सरकारच्या मदतीच्या घोषणांची अतिवृष्टी तर शेतकऱ्यांच्या गळाला फास

परळी -वैजनाथ –  आठवड्यामध्ये सलग दोन दिवस पावसाने जोरदार हजेरील लावली होती. यामुळे जिल्हयातील 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती, अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून जिल्ह्यातील 657 गावांमधील 1 लाख 44 हजार 564 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.मात्र संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप देखील कवडी देखील मिळाली नसल्याने शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवून घेत आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून लाखो एक्करावर उभे असलेले पीक पावसाच्या पाण्याने जमीनदोस्त झाले आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा उध्वस्त झाला आहे.राज्याच्या कृषी मंत्र्याच्या मतदार संघातच सात दिवसात तीन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले.संविधानिक पालकत्व असलेल्या राज्याच्या कृषी मंत्र्याच्या मतदार संघातच अशी लाजिरवाणी घटना समोर आल्याने राज्यकर्ते केवळ मदतीच्या घोषणांची तर विरोधकाकडून मागणीची अतिवृष्टी करत असून प्रत्यक्ष मदत अथवा केलेल्या घोषणांची अंमलबजावणी शून्य होत असल्याने पुन्हा एकवेळ शेतकरी आत्महत्या मालिका सुरू होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. राज्यकर्त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी यासह इतर मागण्या घेत सोमवार दि 9 पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बीड जिल्हा किसान सभेकडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे शेतातील बाजरी, सोयाबीन, कापूस, उडीद, तुर, मुग आदींसह फळ आणि पालेभाज्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड, माजलगाव, गेवराई, अंबाजोगाई आणि परळी तालुक्यांना बसला असून या तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावातील शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ याला तोंड देत शेती करणारा जिल्ह्यातील शेतकरी यावर्षीच्या अतिवृष्टीने पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.सततची नापिकी, कर्ज आणि सरकारची नाकर्ती भूमिका यामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या घटना घडताना समोर येत असून राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री असलेल्या मंत्री महोदय यांच्याच मतदार संघात परळी, रेवेली आणि कौडगाव साबळा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.सरकारने  बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी यासह विविध मागण्या संदर्भात किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेकडून कॉ. काशीराम सिरसाट,कॉ. गंगाधर पोटभरे, कॉ.भगवान बडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ. विष्णू देशमुख,कॉ. कृष्णा सोळके,कॉ. पाडूरंग राठोड कॉ. जगतीश फरताडे, कॉ. दादासाहेब सिरसाट, कॉ.एड. संजय चोले, कॉ.राजाभाऊ बादाडे, कॉ.रूस्तुम माने,कॉ.बळीराम देशमुख, कॉ.एड.अजय बुरांडे,डॉ. सावळाराम उबाळे आदींनी
प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
===========
सत्ताधा-याची असंवेदनशीलता तर किसान सभा पुन्हा रस्त्यावर

जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या यांच्याच मतदार संघात तीन शेतकऱ्यांनी मागील 7 दिवसात जीवन संपवून घेतले आहे या पार्श्वभूमीवर पिकविमा वितरण पारदर्शक करण्यासाठी सन २०२३ खरीप व रब्बी पिक विमा वितरणाच्या याद्या प्रकाशित कराव्यात.कापूस – सोयाबीन पिकांची ईपीक पाहणीची अट रद्द करून कुठल्याही अटी शर्ती शिवाय दोन्ही पिकांसाठी प्रत्येकी तीन-तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात यावी. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना NDRF च्या निकषासह व अतिवृष्टीची नोंद नसलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान द्यावे.अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना सॅम्पल सर्वे च्या आधारे तातडीने पिक विमा प्रावधानानुसार  पीक विमा अदा करावा.शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज सरसकट माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे.

पीक कर्जापासून वंचित असणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्जाची वाटप करावे यासह इतर मागण्या घेऊन किसान सभेकडून सोमवार दि 9 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

कॉ. एड.अजय बुरांडे
जिल्हाध्यक्ष बीड जिल्हा किसान सभा