🔶 मराठवाडा मुक्तिसंग्राम
🔺मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सोहळा उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, दि. १७ : कृषी, दळणवळण, उद्योगविकासातून रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात केले.
येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. पोलीस दलातर्फे शस्त्र सलामी, मानवंदना नंतर ध्वजारोहण करण्यात आले.
हुतात्म्यांना अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण ध्वजारोहणा नंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणात सुरुवातीला त्यांनी मुक्ति लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुक्तिसंग्रामासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. काशिनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी, सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातमेश्वरकर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम अजरामर केला आहे. भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाविरुध्द पोलीस कारवाई सुरु केली. पोलीस कारवाई सुरु होताच काही दिवसातच भारतीय सेनेने हैद्राबाद संस्थानावर ताबा मिळविला आणि लढ्याला यश प्राप्त झाले.