🔶 परळीत शेतकरी हक्क परिषदेचा भव्य ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चा
परळी (प्रतिनिधी)- परळी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री यांना राज्यात नेतृत्व करण्याची संधी याच मतदार संघातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांनी दिली. मात्र जनतेने टाकलेल्या विश्र्वासाचा घात काढण्याचे काम त्यांनी केले. जगमित्र सहकारी साखर कारखाना काढण्याचे आश्वासन दिले मात्र तेही पूर्ण केले नाही, झालेच तर संत जगमीत्र सूतगिरणी चालू स्थितीत असताना बंद पाडली, स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद पाडला यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. राज्याचे कृषिमंत्री असतांनाही त्यांना या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवता आल्या नाहीत. शासन प्रशासनाचा त्यांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे वापर केला आणि जनतेला वाऱ्यावर सोडून दिले असल्याचा घणाघात राजेभाऊ फड यांनी परळीतील शेतकरी हक्क परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात केला.
सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर रोजी परळी शहरातून भव्य ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. परळी विधानसभा मतदार संघातील हजारो शेतकरी बांधव आपापले ट्रॅक्टर व बैलगाडी घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. प्रभू वैद्यनाथ मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा नेहरू चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर, मोंढा मार्केट, एकमिनार चौक, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मौलाना आझाद चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. याप्रसंगी अनेकांची भाषणे झाली. युवक नेते राजाभाऊ फड यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवताना शासन आणि प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. राज्याच्या कृषिमंत्र्यांचा मतदार संघ असूनही हा मतदार संघ विकासाच्या बाबतीत भकास झाला आहे.
सततचा दुष्काळ, नेहमीच होणारी अतिवृष्टी आणि शेतीपूरक व्यवसाय बंद पडल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रताप कृषिमंत्र्यांनी केला असून ज्या जनतेने त्यांना खुर्चीत बसवले आता तीच जनता त्यांना खाली खेचणार यात तिळमात्र शंका नसल्याचा आरोप राजाभाऊ फड यांनी केला.