निवडणूक विशेष लेखमाला- लेख क्रमांक १
नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक आणि येणाऱ्या काळात होणारी विधानसभा निवडणूक ही खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा फायदा घेणारी निवडणूक ठरणार आहे. यापूर्वीच्या काळात ज्यांनी निवडणूक कामकाज केले आहे, अशा सर्वांना ही निवडणूक नवा अनुभव देणारी ठरणार हे निश्चित आहे.
तंत्राच्या क्रांतीमुळे पूर्वीच्या मतपेट्या आणि मतपत्रिका छपाई अशा खूप मोठ्या व्यापातून सर्वांची सुटका झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर मतदारांची मानसिकता देखील महत्वाची ठरणारी आहे. काय फरक पडतो माझ्या एका मताने… असा विचार करणारा मतदार आता मतदान करण्यास ऊत्सुक असल्याचे सकारात्मक चित्र यंदा दिसत आहे. यामागेही तंत्राची प्रगती हेच कारण आहे.
गेल्या दशकभरात मुद्रीत माध्यमांसोबत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. वृत्तवाहिन्यांची संख्या वाढली. आऊटडोअर ब्रॉडकास्टींग व्हॅन्स अर्थात ओ.बी.व्हॅन्सची जागा आता सॅटेलाईट लिंकिंग किट्सनी घेतल्याने प्रक्षेपण क्षेत्रात क्रांती आली. यामुळे कोणत्याही ठिकाणावरुन थेट प्रक्षेपणासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच खर्च यात कपात झाली. परिणामी छोट्या छोट्या ठिकाणांवरुन थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळत आहे.
दुसऱ्या बाजूला संवेदनशील मतदान केंद्रांवर होणार असलेल्या मतदानावर निवडणूक आयोग वेबकास्टींगच्या मदतीने थेट लक्ष ठेवत आहे, यामुळे निवडणूक प्रक्रीया अतिशय पारदर्शी होणार आहे. याचाही सकारात्मक परिणाम निवडणुकीत आपणास दिसेल, लोकांची नकारात्मक व उदासीन मानसिकता यामुळे निश्चितपणे दूर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत आणखी एक महत्वाचा बदल दिसणार आहे तो म्हणजे मतदान करण्यासाठी ज्या पोलचिटस् (Voter Slip) चा वापर होतो, त्या फोटो पोलचिटस् निवडणूक यंत्रणा मतदारांना स्वत: देणार आहे. यापूर्वी राजकीय पक्ष या प्रकारचे काम करताना दिसत होते.
निवडणूक आणि खर्च असंही एक गणित आहे. यंदा उमेदवारांना आयोगाने खर्चाची मर्यादा वाढवून दिली. याचा फायदा उमेदवार उचलत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त झाल्याचे चित्र दिसत आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत ते पोहचत आहेत. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवलेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून फेसबूक व ट्विटर ( आता X ) आणि व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियातूनही याबाबत प्रचार व प्रसाराचे कार्य होत आहे.
नव माध्यम अर्थात सोशल मीडिया सध्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे याचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम मतदारांवर होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर माहितीचे वहन सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे परंतु या माहितीतली सत्यता सांगणे अशक्य असते त्यामुळे मतदारांनी सजगपणे या माहितीकडे बघितले पाहिजे. कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्ड असा प्रकार न करता माहिती खरी आहे याची खात्री प्रत्येकाने आगामी काळात करावी अशी जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाकडून अपेक्षा राहणार आहे. यंत्रणा आपल्या पद्धतीने यावर लक्ष ठेवत आहे परंतु सजग मतदार म्हणून मतदाराची भूमिका यात महत्त्वाची ठरणारी आहे.
या सर्व बदलांसह येणाऱ्या निवडणुकीत ज्याला राजा म्हटले जाते अशा मतदार राजाला पटलं पाहिजे की… ‘हो… माझ्या एका मतानेही फरक पडतो….’ म्हणजेच निवडणुकीतील मतांचा टक्का वाढेल.
-प्रशांत दैठणकर,
जिल्हा माहिती अधिकारी