🔹 पर्यटन – रत्नागिरी-कृषि पर्यटन – 🔹 सागर किनारे
🔸 पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले अभिनंदन
मुंबई ।रत्नागिरी- कोकणात पर्यटन व्यवसायातून मोठी उलाढाल होत आहे. त्यातच भेट देणाऱ्या पर्यटकांना उत्तम सेवा सुविधा मिळत असल्याने पर्यटकांचा ओढा कोकणात वाढतो आहे. नुकताच जागतिक पर्यटनदिनी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सह संचालक स्वप्निल कापडणीस, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९९१ गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ३६ गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातील १२६ ग्रामपंचायतीने यामध्ये, सहभाग घेतला होता. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्रकिनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे.
