CRPFच्या इतिहासात सफाई कामगार, स्वयंपाकी यांना मिळाली पदोन्नतीः

PC -Image posted on X By CRPF India


◾सीआरपीएफने प्रथमच या स्तरावरील जवानांना पदोन्नती दिली

नवी दिल्ली- देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या  केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ)(CRPF) आपल्या 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सफाई कामगार आणि शिपाई यांना पदोन्नती दिली आहे. सोमवारी, दिल्लीतील सीआरपीएफ मुख्यालयासह अनेक सीआरपीएफ कार्यालयांमध्ये समारंभ आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये 217 कर्मचाऱ्यांना नवीन पदे देण्यात आली. हे कर्मचारी सीआरपीएफच्या पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा भाग आहेत. सरकारच्या निर्णयानंतर सीआरपीएफने प्रथमच या स्तरावरील जवानांना पदोन्नती दिली आहे.

दरम्यान पदोन्नती नंतर पदोन्नती मिळालेल्या सीआरपीएफ जवानांचा गणवेशही वेगळा असणार आहे. सीआरपीएफचे महासंचालक (डीजी) ए. डी. सिंग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदांचे गणवेश सादर केले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचे अभिनंदन केले. डीजी म्हणाले की, सीआरपीएफचा प्रत्येक सदस्य, तो कोणत्याही पदावर असला तरीही, देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा उपक्रम हे सिद्ध करतो की समर्पण आणि सेवा आपल्या दलाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येऊ शकते.

◾ मुख्यत्वे आत्तापर्यंत सीआरपीएफ मधील जवानांना ते ज्या पदावर नियुक्त होत असत त्याच पदावर ते निवृत्त ही होत असत, मात्र या समारंभात 217 जवानांना हवालदार पदावरून हेड कॉन्स्टेबल पदावर बढती देण्यात आली आहे. या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी कधीही बढती मिळाली नव्हती. सीआरपीएफमध्ये सध्या सुमारे 3.25 लाख जवान सेवेत आहेत. हे देशाचे प्रमुख अंतर्गत सुरक्षा दल म्हणून ओळखले जाते आणि सध्या ते प्रामुख्याने तीन लढाऊ क्षेत्रांमध्ये तैनात आहेत.