आकाशवाणी प्रसारण
प्रसार भारतीची दुपारच्या स्थानिक प्रसारणाला मंजुरी
पुणे- : पुणे हे देशातील आकाशवाणीचे सर्वाधिक श्रोते असलेले शहर असूनही प्रसार भारतीच्या धोरणात्मक निर्णयामुळे दोन वर्षांपूर्वी पुण्यासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांची दुपारची आणि सायंकाळची स्थानिक प्रसारण निर्मिती बंद करून त्याऐवजी त्यांना मुंबई केंद्र सहक्षेपित करण्याचे आदेश देण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी पुणे केंद्राचे दुपारचे स्थानिक प्रसारण आता रविवारपासून (दि. 6) पुन्हा सुरू होणार आहे. प्रसार भारतीकडून याला मंजुरी देण्यात आली आहे.
सायंकाळचे स्थानिक प्रसारण सुरू झाल्यानंतर पुणे केंद्राचे दुपारचे स्थानिक प्रसारण पूर्ववत सुरू व्हावे, अशी मागणी श्रोते, कलाकार करत होते, या निर्णयामुळे श्रोत्यांनी आनंद व्यक्त केला.हे प्रसारणही सुरू करण्यात यावे, अशी सातत्याने मागणी केली जात होती. अखेर रविवार (दि. 6) पासून दुपारचेही स्थानिक प्रसारण सुरू होत आहे. याविषयी आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल म्हणाले, वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार दोन वर्षापूर्वी दुपारचे स्थानिक प्रसारण बंद होऊन आकाशवाणी मुंबईचे प्रसारण पुण्याहून सहक्षेपित केले जात होते.
सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तिन्ही प्रसारणांची निर्मिती आता पुणे केंद्रातून स्थानिक पातळीवर होणार आहे. दुपारचे स्थानिक प्रसारण सुरू झाल्यामुळे आता वनिता मंडळ, सखी संदेश, भावधारा आदी कार्यक्रम पुन्हा सुरू होतील. 1953 सालापासून आकाशवाणीचे पुणे केंद्र कार्यरत आहे.
प्रसार भारतीकडे श्रोत्यांकडून काही मागण्या होत असून आकाशवाणी पुणे केंद्र सध्या मध्यम लहरीवर (मीडियम वेव्ह) उपलब्ध आहे. आत्ताच्या नवीन तंत्रज्ञान च्या साह्याने पुणे केंद्र एफ.एम. वर उपलब्ध करून द्यावे, यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
देशात एकूण 25 शहरात आकाशवाणीचे एफ. एम. रेनबो चॅनेल आहे, पुणे केंद्रातही हे रेनबो चॅनेल सुरू करण्यात यावे, अशी ही मागणीही रसिक श्रोते करत आहेत.
