नाशिक शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा सुशोभीकरणाचे उद्या भूमिपूजन

साहित्य

नाशिक : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून आणि शाहिरीतून श्रमिक वर्ग, दलित, आणि वंचितांचा आवाज सर्वत्र पोहोचविला. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्याचे काम या सुशोभीकरणाच्या उपक्रमातून केले जात आहे. जिल्हा परिषद मुख्यालयासमोरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी आ. प्रा. देवयानी सुहास फरांदे यांच्या आमदार निधीतून एक कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन रविवारी (दि. ६) होणार आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याने मराठी साहित्य, समाजसुधारणा आणि सांस्कृतिक क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे कार्य आणि जीवनप्रवास हे सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढाईचे प्रतीक आहे. सुशोभिकरणाच्या कामात पुतळ्याच्या परिसराची योग्य प्रकाशयोजना आणि आकर्षक सजावट यांचा समावेश आहे. या कामामुळे लोकांना अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आ. देवयानी फरांदे यांनी व्यक्त केला. या कामाचे भूमिपूजन रविवारी (दि. ६) अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ होणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आ. फरांदे यांनी केले आहे.