भ्रमंती -प्रवासातील रंजक आणि कल्पक अनुभव – नमिता प्रशांत
कसंय… घर असो दार असो, पाय ठेवताच त्या जागेतला खराखुरा भाव कळायला वेळ लागत नसतो..खरंय ना…!
असो, आम्ही एकदा सकाळी सकाळी एका गॅरेजला थांबलो. मला काय गाडीत बसून राहायची सवय नाहीये, पाच मिनिटांसाठी का असेना…हे जिथे उतरतील तिथे मीपण आपले पाय मोकळे करून घेते. उतरताच माझी नजर गॅरेजवाल्या “शिरू पाटलांच्या” प्रसन्न चेहऱ्यावर आणि त्यांच्या कपाळावरील टिळ्यावर पडली आणि लगोलग नजर फिरली ती पाटलांच्या कलाकारीवर. म्हटलं, ‘काय पाटील, वारकरी का?…तर म्हणाले, ‘हो.. दरवर्षी न चुकता माऊली ‘…
त्यांच्या डोळयांतली चमक पाहून म्हटलं, ‘तुमची मस्त फुललेली तुळसच सांगू लागली हो..’ तर अस्से लाजून गोड हसलेतना.. काय सांगू… क्षणभर स्वतःचंच कौतुक वाटावं अशा अविर्भावात म्हणाले, ‘मी स्वतः बनविलंय हे वृंदावन..’ फोटो घेऊ का याचा म्हटल्यावर मात्र अवघडले. त्यांना वाटलं असावं, फोटो घेण्यासारखं काय आहे बुवा यांत…!
पण फार आनंदाने फोटोसाठी उभे राहिलेत…बहुतेक आम्ही जेवढं कौतुक केलं तेव्हढं कुणी केलं नसावं आजवर.
पण तुम्हीच बघा, किती कौतुकास्पद आहे ही कलाकारी.. ज्या कामात भक्तीचा भाव उमटतो, ते थेट पोहोचलेलं असतं त्याच्यापर्यंत.. तो कधीना कधी, कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हांला तुमच्या कामाची दाद द्यायला जरूर येतो हे खरंच आहे.
मला फार आवडलं हे गॅरेजवाल्याचं त्याच्या कामाला, त्याच्या जागेला साजेसं टायरपासून बनविलेलं वृंदावन.. त्यातील तुळस बघा, किती कोवळी गोड हसतेय…
एवढं आजवर कधी लाखों रुपयांच्या वृंदावनानं खिळवून ठेवलं नाही.. 

आपल्या कामातच आपल्याला देव दिसावा याहून श्रेष्ठ भक्ती नाही, याचं एक छानसं उदाहरण या प्रवासादरम्यान गवसलं..
तसंही प्रत्येक प्रवास काहीतरी शिकविणारा म्हणजेच कोडे उलगडणारा, सतत डोक्यात भुणभुण करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देणारा, कधी अधिक संवेदनशील तर कधी आभाळफाड आनंद देणारा ठरतोच हे नक्कीय.
– नमिताप्रशांत 

