शेतकरी विरोधी सरकारची दशक्रिया संपन्न

बळीराजा कडून बीडमध्ये करण्यात येणार चौदावा

बीड/धारूर – प्रतिनिधी- नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा नाही, अनुदान नाही. कठीण परिस्थितीत कसेबसे पिकविलेल्या शेतमालाला भाव नाही. चौहीकडून शेतकऱ्यांचा गळा घोटणाऱ्या सरकारचा दशक्रिया विधी रविवार दि 13 रोजी तेलगाव येथे करण्यात आला असून चौदावा बीड येथे करण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बीडच्या दिशेने प्रवास सूरू केला असल्याची माहिती किसान सभेचे बीड जिल्हा अध्यक्ष काॅ.एड.अजय बुरांडे यांनी दिली.

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारच्या विरोधात किसान सभेच्या वतीने तेलगाव येथे गेल्या दहा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. शेतकरी या सरकारच्या धोरणामुळे व नैसर्गिक संकटाने पूर्णपणे कोलमडला आहे. अशा संकटात शेतकऱ्यांना विम्याचा आधार मिळणे हा शेतकऱ्याचा हक्क आहे. पण वीमा योजनेतून शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी विमा कंपन्यांचे व राजकीय दलालांचे खिसे भरण्यात सरकारला जास्त रस आहे. त्यामुळे विमा दिल्याच्या नुसत्या घोषणा केल्या जात आहेत.मात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दिली जात नाही. अनुदान वाटपाच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. शेतमालाचे भाव तर या वर्षी पार रसातळाला गेले आहेत. हमी भावापेक्षा खूप कमी भाव व्यापारी देत आहेत. खरेदी केंद्र सुरू करण्याच्या फक्त थापा मारल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर किसान सभेने दि 9 ते 12 सप्टेंबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांनी लेखी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करा म्हणून गेली दहा दिवस तेलगाव येथे धरणे आंदोलन केले. मात्र मुर्दाड सरकारने त्याकडे सपसेल दुर्लक्ष केले. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी अशा मुर्दाड सरकाचा दशक्रिया विधी तेलगाव येथे केला.

सरकारच्या नावे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करून चौदावा करण्यासाठी शेतकरी पायी चालत बीडच्या दिशेने निघाले आहेत. दि 13 ऑक्टोबर रोजी तेलगाव येथून चालत निघून दि 16 रोजी हे शेतकरी बीड येथे पोहचतील या प्रवासात जागोजागी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध आणि हक्काच्या लढाईचा एल्गार करत किसान सभेचे हे शेकडो शेतकरी पुढचं पाऊल टाकत आत्ता बीड गाठत आहेत.पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होऊन जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळण्याचे संकेत दिसत आहेत.या आंदोलनासाठी कॉ.दत्ता काका डाके,कॉ.एड.अजय बुरांडे,कॉ.मुरलीधर नागरगोजे,कॉ.जगदीश फरताडे,कॉ.भगवान बडे, कॉ.कडभाने,कॉ.ब्राम्हनंद देशमुख, कॉ.विष्णूपंत देशमुख,कॉ.कृष्णा सोळंके, कॉ.सुभाष डाके, कॉ.अशोक डाके,कॉ.काशीराम सिरसाट, कॉ.ऍड.चोले, दादासाहेब सिरसाट आदींनी परिश्रम घेतले.खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट देऊन सोबत असण्याचा शब्द दिला.रामराव लगड (माजी शिक्षण अधिकारी) यांनी पाठिंबा दिला.विठ्ठल लगड आणि संपूर्ण तेलगाव ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.
●●●●●●●●
आम्हा शेतकऱ्यांना दुर्लक्ष करून प्रशासन आणि शासनाने आमचा अंत पाहण्याचा मनसुभा बांधला आहे, पण आम्ही दिल्लीशहाला झुकवणाऱ्या लढवय्या शेतकऱ्यांचा वारसा सांगणारे आहोत. तुमचे सगळे मनसुभे आम्ही लोकशाहीच्या मार्गाच्या अथक संघर्षातून उधळून लावू

कॉ.एड.अजय बुरांडे
जिल्हाध्यक्ष किसान सभा बीड