संग्रहित छायाचित्र
🔷 शहर परिसरातील टोल माफ करावा अशी अनेक दिवसाची मागणी, 🔷४ टोलची मुदत २०२७ तर एक टोलची २०२९
मुंबई – येत्या विधानसभा निवडणूका डोळ्या समोर ठेऊन मुंबईत प्रवेश करणाऱ्या ५ टोलनाक्यांवर हलकी वाहने, स्कूल बसेस आणि एसटी बसेसना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. हलक्या वाहनांमध्ये कार, जीप, ट्रॅक्टर आदी वाहनांचा समावेश होतो. या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ व ठाणे व पालघर परिसरातील २४ अशा एकूण ६० मतदारसंघांमधील मतदारांना खुश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
मुंबई शहरात प्रवेश करताना मार्गातील १) शीव-पनवेल महामार्गावरील- वाशी, २) लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील मुलुंड, ३) पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड ४) ऐरोली पुलाजवळ आणि ५) पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर या ठिकाणी टोलनाके आहेत. प्रतिदिन या टोल नाक्यावरून सुमारे ३ ते ३.५ लाख लहान-मोठी वाहने मुंबईत प्रवास करतात. या वाहनांना सुमारे ४५ ते ७५ रुपये टोल भरावा लागतो. शहराच्या हद्दीतील हा टोल माफ करावा, अशी मागणी सातत्याने होत होती. टोलमाफीच्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा भुर्दंड बसेल आणि राज्य रस्ते विकास महामंडळास त्याची भरपाई द्यावी लागेल.

